शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घिसाडघाई कशासाठी? : परशुराम उपरकर | पुढारी

शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याची घिसाडघाई कशासाठी? : परशुराम उपरकर

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्गात होवू घातलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी अद्यापही इमारती, साहित्य, पदांची नियुक्तीसह अशा अनेक सोयी सुविधांची वानवा आहे. या ठिकाणचे डिनही प्रभारी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोविड साहित्य खरेदीसाठी आलेला निधी खर्च करून जिल्हा रूग्णालयात या मेडिकल कॉलेजसाठी तात्पुरती डागडुजी व सुविधा केल्या जात आहेत. मात्र सोयीसुविधा नसताना हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी घिसाडघाई कशासाठी? असा सवाल मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला आहे. त्यांनी सिंधुदुर्गातील शिवसेना सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र सोडले. एक वर्ष थांबा पण सर्व सोयीसुविधा पूर्ण करून कॉलेज सुरू करा, जेणेकरून पूर्ण क्षमतेने हे कॉलेज चालेल असा सल्लाही त्यांनी दिला.

कणकवलीतील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, शासकीय मेडिकल कॉलेजसाठी 22 एकर जागा आवश्यक आहे. सध्या सिंधुदुर्गनगरीत होवू घातलेल्या मेडिकल कॉलेजसाठी शासकीय जागेचे अद्याप संपादन झालेले नाही. केवळ फलक लावलेले आहेत. जिल्ह्याला आलेल्या कोविड निधीतून खाटा, जनरेटर या साहित्याची खरेदी केली जात आहे. जिल्हा रूग्णालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. नर्सिंग कॉलेजची तोडफोड करून पार्टीशन करण्यात आले आहे. अद्ययावत ऑपरेशन थिएटरसह डॉक्टरांची निवासस्थाने अशा अनेक इमारतींची वानवा आहे, असा त्यांनी आरोप केला आहे.

ते पुढे म्हणाले की, केवळ वरवरचा दिखावा करून केंद्रीय मेडिकल आयोगाची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अलिकडेच जिल्ह्यात आलेले प्रभारी डीन डॉ. मोरे यांची भेट घेतली. येत्या मंगळवारी दिल्लीला जाऊन समीतीने काढलेल्या त्रुटीबाबत फेरअहवाल देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही सर्व वस्तुस्थिती पाहता यंदा मेडिकल कॉलेजचे अ‍ॅडमिशन होणार नाही असे दिसते. डीन म्हणून डॉ. मोरे यांच्याकडे एखाददुसरा स्टाफ, 25 खुर्च्या असे नामधारी ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचा या मेडिकल कॉलेजसाठी शासन निर्णय झाला असला तरी आवश्यक स्टाफ व इतर बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाने कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच संभ्रमात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केलेल्या 650 कोटी निधी पैकी 100 कोटी यंदा मिळाले तरी त्यातून इमारती व अन्य काम करता येईल. या कॉलेजमध्ये राज्य आणि देशातूनही विद्यार्थी येणार असल्याने कॉलेज परिपूर्ण होणे आवश्यक असल्याचे उपरकर यांनी सांगितले.

Back to top button