राजापूर : पुढारी वृत्तसेवा : कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारसू येथे सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. शनिवार (दि.६)सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे बारसू येथील ग्रामस्थांना भेटण्यासाठी येणार आहेत. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बारसू येथे सभा घेणार होते. यासाठी ठाकरे गटाकडून प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र बारसू येथील आंदोलन लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या आधीच जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे ठाकरे यांना बारसू येथे सभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने कोंबे येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह बारसू येथे दाखल होणार आहेत दरम्यान, बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरु होती.
बारसू रिफायनरीचा संघर्ष पेटला असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारसुला भेट देणार असून त्यांचा दौरा यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. पदाधिकाऱ्यांनी आज (दि.५) कोंबे येथील हेलीपॅडची पाहणी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
याबाबत सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे शनिवारी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. कोंबे येथे हेलिपॅड उभारण्यात आले आहे. तेथून ते राजापूरमार्गे बारसुला जाणार आहेत. परिसरातील कातळशिल्पे यांची पाहणी करुन रानतळे येथे ठाकरे प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, वैभव नाईक आदीसह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा