Ratnagiri : रत्नागिरी पंचायत समितीच्या मुख्य इमारतीचे भूमिपूजन वादात - पुढारी

Ratnagiri : रत्नागिरी पंचायत समितीच्या मुख्य इमारतीचे भूमिपूजन वादात

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी ( Ratnagiri ) पंचायत समितीच्या ( panchayt samiti ) मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन सध्या वादात सापडले आहे. या भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर जि.प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांची नावेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे जि.प. अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमाला गैरहजर असल्याचे दिसून आले. जि.प. अध्यक्षांनी तर या प्रकरणानंतर आक्रमक पवित्रा घेत संबंधीत गटविकास अधिकार्‍यांना कारणेदाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत.

रत्नागिरी ( Ratnagiri ) पंचायत समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचा भुमिपूजन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. या इमारतीला 12 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र हा भूमिपूजन सोहळा सध्या वादात तसेच चर्चेतही आला आहे. निमंत्रण पत्रिकेत ना जि.प. अध्यक्षांचे नाव ना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे नाव. विशेष म्हणजे ज्यांनी ही इमारत मंजूर केली त्या ग्रामविकास मंत्र्यांचेही या पत्रिकेत नाव नाही. त्याचबरोबर जिल्हाधिकार्‍यांचेही नाव नसल्याचे समोर आले आहे.

मूळात स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत हे तीन स्तर आहेत. त्यापैकी जिल्हा परिषद ही वरिष्ठ स्तर आहे. यामुळे पंचायत समिती व ग्रामपंचायतीचा बॉस हा जिल्हा परिषद आहे. कोणतेही प्रशासकीय काम करताना जिल्हा परिषदेची मंजूरी आवश्यक असते. त्यांच्या मार्फतच शासनाकडे सर्व प्रस्ताव पाठवले जातात. असे असताना पंचायत समितीच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदच्या एकाही अधिकारी तसेच पदाधिकार्‍याचे नाव नसणे ही बाब दुर्दैवाची आहे.

या प्रकारानंतर जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव हे आक्रमक झाले आहेत. या कार्यक्रमाला ते गैरहजर राहिले. या सर्व प्रकारणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून त्यापूर्वी संबंधीत गटविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, अशा सूचना त्यांनी जि.प. प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे आता हे प्रकरण वादात सापडले आहे.

असा होता प.स. इमारतीचा प्रवास…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प.स.ची इमारत होती. इमारत फार जूनी असल्याने ती मोडकळीस आली असल्याने तिचे निर्लेखन करण्यात आले. त्यानंतर प.स.चा कारभार जि.प. भवनाच्या आवारात हलवण्यात आला. यावेळी जि.प. प्रशासनाने कोणताही विचार न करता त्यांना जागा दिली. त्याचबरोबर नवीन इमारत मंजूरीसाठी जि.प. प्रशासनातर्फे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. एकदा तर स्थायी समिती मंजूरीसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या समोर जावून बसली होती. असे असताना जि.प.चा विसर पडणे ही बाब दुर्दैवी आहे, अशी चर्चा सुरू आहे.

या भूमिपूजन सोहळ्याचे तोंडी निमंत्रण होते. त्यानुसार मी हजरही राहणार होतो. परंतु निमंत्रण पत्रिका आल्यानंतर त्यामध्ये माझे अध्यक्ष म्हणून नाव नव्हतं. वास्तविक पं.स.ही जि.प.चेच अंग आहे. प्रोटोकॉलनुसार जि.प. पदाधिकारी व अधिकार्‍यांची नावे येणे अपेक्षित होते. तसे न झाल्याने संबंधीत गटविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.
– विक्रांत जाधवजि.प. अध्यक्ष, रत्नागिरी

Back to top button