चिपी विमानतळ गाठूक किती येळ लागतलो? सर्वांधिक अंतर कोणाला ? | पुढारी

चिपी विमानतळ गाठूक किती येळ लागतलो? सर्वांधिक अंतर कोणाला ?

कुडाळ : प्रमोद म्हाडगुत

एक-दोन नव्हे तर तब्बल 20 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वेंगुर्ले तालुक्यातील चिपी माळरानावर साकारलेल्या सिंधुदुर्ग विमानतळावर विमानाचे‘लॅन्डिंग आणि टेक ऑफ’ची टेस्ट यशस्वी झाल्यानंतर सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण झाले. चिपी विमानतळ सुरु झाल्याने तमाम सिंधुदुर्गवासीयांच्या आशा पल्‍लवीत झाल्या आहेत.

दुसरीकडे सिंधुदुर्ग विमानतळावर जावक किती अंतर पडतला? गाडयेन किती वेळ लागतलो? तिकीट अडीज हजाराच आसतला मा..? अशा चर्चा गावागावात ऐकू येत आहेत. दै.पुढारीने जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणापासून सिंधुदुर्ग विमानतळाचे अंतर किती असेल, याची माहिती घेतली. जिल्ह्यातील विजयदुर्ग पासून विमानतळ सर्वात जास्त अंतरावर तर सर्वात कमी अंतर मालवण शहरापासून असल्याचे दिसून आले.

सिंधुदुर्ग विमानतळ वेंगुर्ले तालुक्यात आहे, पण तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या वेंगुर्ले शहरापासून सिंधुदुर्ग विमानतळ 29 किमी.अंतरावर आहे. वेंगुर्ले तालुक्यात सिंधुदुर्ग विमानतळ असूनही वेंगुर्ले शहराला ते जवळ नाही. उलट सिंधुदुर्ग विमानतळापासून 18 किमी.वरील मालवण शहराला हे विमानतळ सर्वात जवळ आहे.

कुडाळ शहर ते सिंधुदुर्ग विमानतळ 23 कि.मी., सिंधुदुर्गनगरी-सिंधुदुर्ग विमानतळ 35 कि.मी. सावंतवाडी-चिपी सागरीमार्गे 45 कि.मी.,सावंतवाडी-पिंगुळी-पाट मार्गे 39 कि.मी., वैभववाडी-कणकवली ते सिंधुदुर्ग विमानतळ 93 कि.मी., विजयदुर्ग-देवगड-मालवण ते विमानतळ 101 कि.मी., दोडामार्ग-बांदा-पिंगुळी-पाट ते चिपी 78 कि.मी. असे जिल्ह्यातील प्रमुख शहरांपासून विमानतळा पर्यंतचे अंतर आहे.

एकूणच वैभववाडीतून सिंधुदुर्ग विमानतळापर्यंत खासगी गाडीने येण्यास दोन तास, विजयदुर्ग -चिपी दीड तास, सिंधुदुर्गनगरी ते विमानतळ 45 मिनीटे, मालवण ते विमानतळ 10 मिनिटे, कुडाळ ते विमानतळ 30 मि., सावंतवाडी ते विमानतळ 45 मि., दोडामार्ग
ते विमानतळ 1 तास 45 मि. आंबोली ते विमानतळ 1 तास 15 मि.असा वेळ लागेल.

जिल्ह्यातील या सर्व प्रमुख ठिकाणावरूनचे सिंधुदुर्ग विमानतळापर्यंत येण्याचे अंतर मालवण शहर वगळता अर्धा तासापेक्षा जास्त आहे. सिंधुदुर्ग विमानतळ (चिपी) ते मुंबई हा प्रवास केवळ 1 तास 25 मिनिटांचा आहे. पण विमानतळावर दोन तास आधी प्रवाशांना हजर रहावे लागेल. या दोन तासात प्रवाशासह सामानाची तपासणी (चेक आऊट) केली जाईल.

विमानतळाला जोडणारे मार्ग सुस्थितीत हवे!

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणमुळे चिपी विमानतळाकडे येण्यासाठी कणकवली, वैभववाडी व सावंतवाडी येथून येणार्‍या प्रवाशांचा काहीसा वेळ वाचेल. पण वैभववाडी ते कणकवली, आंबोली ते सावंतवाडी, दोडामार्ग ते सावंतवाडी अशा रस्त्याची स्थिती खराब असल्याने प्रवाशांना जास्त वेळ लागेल.

ग्रामीण भागातून येणार्‍या प्रवाशांना तर रस्त्याच्या दशावतारामुळे खूपच वेळ लागणार आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग विमानतळाला मुंबई -गोवा महामार्गाला जोडणारा पिंगुळी-पाट मार्गे चिपी हा महत्वाचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग सध्या पिंगुळी ते पाट दरम्यान पुरता खड्डेमय झाला आहे. खा.विनायक राऊत यांनी आठ दिवसांपूर्वी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. मात्र तो रस्ता उद्घाटनापर्यंत सुस्थितीत होईल का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button