मुख्यमंत्री-राणेंमध्ये व्यासपीठावर जुगलबंदी | पुढारी

मुख्यमंत्री-राणेंमध्ये व्यासपीठावर जुगलबंदी

चिपी ः गणेश जेठे, प्रमोद म्हाडगुत

शनिवारी चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अनेक वर्षानंतर एकाच व्यासपीठावर आले होते. अपेक्षेप्रमाणे राणे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे यांना अनेक खोचक टोले लगावले. ठाकरे आणि राणे यांच्या जुगलबंदीच्या ‘उड्डाणा’मुळे सिंधुदुर्ग विमानतळ लोकार्पण सोहळा मात्र खूपच गाजला. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आपणच केल्याचा दावा केल्यानंतर ‘सिंधुदुर्ग किल्लासुद्धा आपणच बांधला असं कुणीतरी सांगेल’ असा प्रतिटोला लगावत राणे यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. बाभळीची झाडे उगवली तर मातीला दोष द्यायचा काय, असेही मिश्कीलपणे म्हणाले. तर वाईट वृत्तीने सिंधुदुर्गात याल तर परत जाणार नाही, असा चक्क इशारा राणे यांनी भर व्यासपीठावर दिला. ठाकरे आणि राणे यांची भाषणे सुरू असताना मात्र शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते ‘आगे बढो’च्या जोरदार घोषणा देऊन वातावरण तापवत होते. मुख्यमंत्र्यांनी विमानांना झेंडा दाखवून या विमानसेवेचे उद्घाटन केले.

सिंधुदुर्ग विमानतळावर शनिवारी एकापाठोपाठ एक तीन विमाने उतरली. दुसर्‍या विमानातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे मुंबईतून सिंधुदुर्गात आले. तिसर्‍या विमानातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि इतर लोकप्रतिनिधी यांचे चिपी येथे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री राणे एकत्र आले होते आणि त्यांच्यात जोरदार जुगलबंदी झाली.

बाभळीची झाडे उगवली तर माती काय करणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आपल्यामुळेच झाल्याचा दावा आपल्या भाषणात केला. त्याचवेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक आरोप केले. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र नेहमीच्या ‘ठाकरे’ शैलीत राणे यांना अनेक खोचक टोले लगावले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही तर आनंदाचा आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सिंधिया आज मी तुमचे खास अभिनंदन करतो. तुम्ही इतके लांब राहूनसुध्दा मराठी मातीचे संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक आणि मातेचा एक संस्कार असतो, अनेक झाडे उगवतात काही बाभळीची असतात बाभळीची झाडे उगविली तर माती म्हणते मी काय करू? असे माती म्हणेल.

विमानतळ पूर्ण होण्यासाठी इतकी वर्षे खर्डेघाशी का?

माझ्यासाठी आजचा दिवस सौभाग्याचा क्षण आहे. कारण कोकण आणि शिवसेना याचं नात कसं आहे हे मी सांगायला नको. कुठेही न झुकणारे बाळासाहेबांचे मस्तक याठिकाणी नतमस्तक झाले आहे. पर्यटन म्हटलं तर गोवा राज्य डोळ्यासमोर येते. खरं तर त्याठिकाणच्या पेक्षा इथलं कोकणच वैभव अधिक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राणे यांनी या विमानतळासाठी आपण प्रयत्न केल्याचे म्हटले होते. हाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळाला एवढी वर्ष का लागली? इतकी खर्डेघाशी का करावी लागली? असा सवाल उपस्थित केला. अनेकजण म्हणत होते, मी कोकणचा कॅलिफोर्निया करेन. त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, कॅलिफोर्नियाला लाजवेल असा कोकण निर्माण करेन. आज त्याची सुरूवात झाली आहे. बाकी पर्यटनाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलेल आहेच, पाठांतर करून बोलण वेगळं असत, आत्मसात करून बोलण वेगळं असत, तळमळीने बोलणं वेगळं असतं आणि मळमळीने बोलणं आणखी वेगळ असतं असे सांगत नारायण राणेंवर मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला.

सिंधुदुर्ग किल्ला मीच बांधला असे कुणीतरी म्हणेल

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, विमानतळाबाबत केंद्रीय मंत्री सिंधियांसोबत झालेली बैठक चांगली झाली. सिंधियांनी स्वतःहून बैठकीची वेळ मागितली होती आणि आजच्या कार्यक्रमात ते स्वतःच तळमळीने बोलले. त्यावेळी मला वाटून गेलं की मी केंद्रीय मंत्री आहे आणि ते राज्याचे मंत्री आहेत. याला कारण आम्हा दोघांची नाळ या मातीशी जोडली गेली आहे. इथे राजकारण येणार नाही. या विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अनेकांना रोजगार मिळतील. असा विश्वास व्यक्त केला. राणे यांनी आपल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आपण केल्याचा दावा केला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कोकणात किल्ले आहेत, निळेशार पाणी आहे. ते जगाला दाखवण्याचा आमचा मानस आहे. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला अशी माझी माहिती आहे. आता हा किल्ला आपणच बांधला असे कुणीतरी म्हणेल, असा अप्रत्यक्षरित्या टोला राणे यांना मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मेडिकल कॉलेजसाठी राणे यांचा फोन आल्याचा गौप्यस्फोट

चिपी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा आमचा मानस आहे. या विमानतळावर एक हेलिपॅड असावे. येथे हेलिकॉप्टरची राईड सुरू केली तर आपल्याला कोकणचे वैभव दाखवता येईल. कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. महाराष्ट्राच्या सर्व पक्षांचे नेते व्यासपीठावर आहेत हा आनंदाचा क्षण आहे. एखाद्या चांगल्या गोष्टीला नजर लागू नये म्हणून काही काळा टिका लागतो. तो पण टिका लावण्याचे काम केले जात आहे. नारायण राणे म्हणाले त्याप्रमाणे खोटं बोलणे बाळासाहेबांना आवडत नव्हते. त्यामुळे खोटं बोलणार्‍यांना बाळासाहेबांनी पक्षातून बाहेर काढत ‘गेट आऊट’ म्हणून सांगितले असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राणे यांना लगावला. आपण आज केंद्रात मंत्री आहात. लघु, सुक्ष्म का असेना, त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करून द्या असा सल्ला राणे यांना दिला. ‘नारायणराव मला आठवतं पण तुम्हाला आठवत नाही, मी विकासात कधीही राजकारण आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या फाईलसंदर्भात तुम्ही मला फोन केला आणि मी दुसर्‍या क्षणी सही केली ’असे सांगत राणे यांनी आपणास फोन केल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. ठाकरे पुढे म्हणाले, पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो म्हणूनच म्हणतात ‘तिळगुळ घ्या आणि गोड- गोड बोला’. कोकण रेल्वेप्रमाणे चिपी विमानतळाचं एक आव्हान होतं. रस्त्यांचे पण एक आव्हान आहे. आज जे काही खड्डे आहेत ते एकत्रित येवुन बुजविण्यात यावेत. विकासाच्या वेळेत कुणीही राजकारण करू नये असा सल्लाही ठाकरे यांनी राणेंचे नाव न घेता दिला.

सिंधुदुर्ग धर्तीचा इतिहास जगभर जाईल ः ज्योतिरादित्य सिंधिया

ज्योतिरादित्य सिंधिया हे या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यांनी दिल्ली येथील आपल्या कार्यालयातून ऑनलाईन मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, महाराष्ट्राशी माझे कौंटुबिक संबंध आहेत. सिंधुदुर्गचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. ते तर शौर्याचे प्रतिक आहेत. सिंधुदुर्गचा किल्ला महाराजांच्या कार्यकाळात निर्माण झाला. मी त्यांचे आज स्मरण करतो. चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्गच्या विकासाच्या नवीन अध्यायला सुरूवात होवून तीन दशकांनी स्वप्न पूर्ण होत आहे. याबद्दल महाराष्ट्र आणि एमआयडीसीला मी धन्यवाद देतो. हे विमानतळ व्हावं हे आमच्या वडिलांचेही स्वप्न होतं. या विमानतळामुळे सिंधुदुर्गच्या धरतीचा इतिहास जगभर जाईल असा विश्वास व्यक्त केला. आता गोव्या प्रमाण सिंधुदुर्गची प्रसिध्दी व्हायला हवी. आज सिंधुदुर्ग ते मुंबई अशा एका फाईटची प्रतिदिन सुरूवात झाली असली तरी येत्या पाच वर्षात 20 ते 25 फाईट या विमानतळावरून सुरू व्हायला पाहिजेत. उडाण योजनेत सिंधुदुर्ग विमानतळ घेतले असल्यामुळे सर्वसामान्यांचा विमान प्रवास सहज होईल. ज्या प्रमाणे आजच्या कार्यक्रमात भाजप , शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय एकत्र आले त्याचप्रमाणे यापुढील काळात एकत्रित जिल्ह्याचा विकास होईल असा विश्वास व्यक्त केला.

वाईट वृत्तीने आलात तर परत जाणार नाही ः नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना आपण या कार्यक्रमात सर्व भांडेफोड करणार असा इशारा दिला होता. त्यानुसार राणे या व्यासपीठावर स्फोटक बोलणे अपेक्षित होते. खरेतर व्यासपीठावर शिवसेनेचेच नेते अधिक प्रमाणात होते. तरीदेखील राणे यांनी आक्रमकपणे भाषण केले. वाईट वृत्तीने सिंधुदुर्गात आलात तर परत जाणार नाही असा गंभीर इशाराही त्यांनी दिला. राणे म्हणाले, सिंधुदुर्गच्या पायाभूत सुविधा ज्या निर्माण झाल्या याला कारण नारायण राणे, दुसरे नाव घेवू शकत नाही. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, याच जाग्यावरून मी आणि सुरेश प्रभू यांनी विमानतळाचे भूमिपूजन केले. त्यावेळी जमीन घेवू देणार नाही, आम्हाला विमानतळ नको असा विरोध करून ठिकठिकाणी अडविण्यात आले असे सांगत राणे यांनी त्यावेळच्या बातमीचे वृत्तपत्रातील कात्रण व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांना दाखवले.

राणे पुढे म्हणाले, त्यावेळी विकासासाठी कोण अडवत होते. सीवर्ल्डसाठी 100 कोटी रूपये ना. अजित पवार यांनी दिले होते. तो प्रकल्प कोणी रद्द केला? आंदोलन कोण करत होते? असा सवाल उपस्थित करत आंदोलन करणारे आता व्यासपीठावर असल्याचेही जाहीर सांगत तुम्ही, समजता, म्हणता तसं नाही. परिस्थिती बदलते मला काही म्हणायचं नाही, तुम्ही आलात मला बर वाटलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचा अभ्यास करावा. येथील विमानतळाला पाणी नाही, विमानतळ झाले पण रस्त्यांचं काय? खरं तर विमानतळ होण्यापुर्वी रस्ते आणि बाकीच्या गोष्टी एमआयडीसीने करणे आवश्यक होते. पण त्या झाल्या नाहीत अशी खंत व्यक्त केली. तसेच निवेदन करत असलेल्या खा. विनायक राऊत यांचा नामोल्लेख करत चिपी विमानतळाचा मालक कोण? एमआयडीसी म्हैसकर की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे कळल नाही असा खोचक सवालही उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरेंना खोटं बोलण कधी आवडत नव्हत. उध्दवजी तुम्हाला सांगितलेली माहिती खरी नाही त्यामुळे गुप्तपणे माहिती घ्या. पर्यावरण मंत्री नवीन आहेत, माझ्या दृष्टीने ते टॅक्स फ्री आहेत. आदित्याने उध्दव ठाकरेंना आपली कर्तबगारी मंत्री म्हणून दाखवावी मला आनंद आहे. या ठिकाणी वाईट बुध्दीने यायचे आणि परत जायचे शक्य नाही. चांगल्या मनाने या आम्ही तुमचे स्वागत करू, मी केंद्रात मंत्री आहे, या महाराष्ट्रात अधिक उद्योग व्हावेत यासाठी मी प्रयत्नात आहे. त्यासाठी एमआयडीसीचेही सहकार्य आवश्यक आहे. मला अडचणी निर्माण केल्या तरी त्याची दखल घेत नाही. विमानतळाच्या आजुबाजुच्या सुशोभिकरणासाठी मुख्यमंत्री म्हणुन तुम्ही अधिक निधी द्या आणि याठिकाणी पायलटचे प्रशिक्षण वर्ग व्हावेत तसेच विमानाचे पार्किंग स्टेशन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार केवळ विकासावर बोलले

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गोव्याला पर्याय ठरतील असे स्वच्छ किनारे या ठिकाणी आहेत. त्याला आता चालना कशी मिळेल? याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत विमानात आमची चर्चा झाली. या विमानाचा इतिहास मोठा आहे. एकाने काहीच होत नाही. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असते. या विमानतळावरील अडीज कि.मी.चा रन-वे साडेतीन कि.मी. होवू शकतो. या विमानातून आता सिंधुदुर्गच्या विकासाची वाटचाल होणार आहे. या विमातळावर विमानाचे नाईट लँन्डिग सुरू करण्याबाबत आमची चर्चा झाली. तसेच रेवस- रेडी रस्ता होण्याबाबतही केंद्रीय मंत्री गडकरींशी चर्चा होणार आहे. ना. गडकरींची महाराष्ट्राला फार मोठी मदत आहे. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गात मंजूर केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा सिंधुदुर्गातील मुलांना फायदा होईल असे सांगितले.

…ही नव्या कोकणची नांदी : बाळासाहेब थोरात

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, चिपी विमानतळाचे उद्घाटन हे सिंधुदुर्गच्या पुढील भविष्याची सुरूवात आहे. कोकण समृध्द आहे. या कोकणला फळे, फुले, वनराई अशी समुद्र संपत्ती निसर्गाने दिली आहे. सर्वांत जास्त पर्यटनाला इथे वाव आहे. आजची सुरूवात नव्या कोकणची नांदी असल्याचे सांगितले.

पर्यटन विकासाची जबाबदारी आपली ः आदित्य ठाकरे

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. इथे वेगळी जादू आहे. ती जगाला दाखवू शकतो. या पुढच्या काळात जगातील प्रत्येक कानाकोपर्‍यातून पर्यटक कसे येतील त्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. कोकणच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. पर्यटनासोबत पर्यावरणही जपण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ना. आठवले म्हणाले की, मुंबईहून विमान आणल्यामुळे सिंधुदुर्गच्या विकासाचे प्रमाण मजबूत होणार आहे. आजचा हा आनंदाचा सोहळा आहे. राजकारण बाजुला ठेवून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजना सिंधुदुर्गात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले. प्रास्ताविकात सुभाष देसाई म्हणाले की, चिपीहून येणारी सर्व विमाने फुल्ल होतील याची मी खात्री देतो. त्यावेळी तत्कालिन हवाई वाहतूक मंत्री माधवराव सिंधिया यांनी या विमानतळासाठी प्रयत्न केले. वेळ खूप लागला पण पायगुण चांगला लागतो. त्यासाठी आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मिळाले म्हणून हे शक्य झालं. खा. विनायक राऊत यांनी सुध्दा यासाठी चांगला पाठपुरावा केला. एमआयडीसीनेही चांगले काम केले म्हणून हे काम शक्य झाले. खर्‍या अर्थाने कोकणचा विकास आजपासुन सुरू झाला.असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खा. विनायक राऊत यांनी केले. तर आभार पालकमंत्री उदय सामंत यांनी मानले.

अन…पहिले विमान 12.45 ला झाले लँन्डिग

सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी निमंत्रितांना घेवुन अलायन्स एअरचे एटीआर 72 विमान 12 वाजुन 45 मिनिटांनी लँन्डिंग झाले. यावेळी स्क्रिनवर विमानाचे लँन्डिग होताच उपस्थितांच्या चेहर्‍यांवर हास्याची लकेर फुलत उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजविण्यात आल्या. हे विमान मुंबईहुन कॅप्टन आकाश, प्रकाश व हर्षदा, कृ मेंबर मानसी, रोषण, रिना, आकाश या एअर लाईन्सच्या टिमने आणले.

निमंत्रितांच्या विमाना अगोदर मुख्यमंत्र्यांचे विमान लँन्डिग

12 सप्टेंबर 2018 रोजी सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर पहिले विमान टेस्ट लँन्डिगसाठी उतरले होते. त्यानंतर दोन ते तीन वेळा टेस्ट लँन्डिग झाल्या आणि शनिवारी सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रितांना घेवुन एअर अलायन्सचे पहिले विमान उतरले. या विमानातुन मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रिय लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे एकत्रित येणार असे बोलले जात होते. मात्र मुख्यमंत्री ठाकरेंचे विमान 11 वाजुन 55 मिनिटांनी म्हणजेच निमंत्रितांच्या विमाना अगोदर 50 मिनिटे आधी आले. निमंत्रितांच्या विमानातुन केंद्रिय मंत्री नारायण राणे, केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, शिक्षण मंत्री आदिती तटकरे,जि.प. अध्यक्ष सौ. संजना सावंत, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत, खा. देसाई, आ. रविंद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे, माजी आ. प्रमोद जठार आदि प्रमुख मंडळी आली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी निमंत्रित पाहुण्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी टेक ऑफ घेणार्‍या विमानाला दाखविला झेंडा

सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर मुंबईहुन निमंत्रितांना घेवुन आलेल्या विमानाने मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी टेक ऑफ घेतले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी झेंडा दाखविला. तर दुरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रिय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी झेंडा दाखविला.

कडेकोट बंदोबस्तात कार्यक्रम संपन्न

विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडुन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी विमानतळाच्या बाहेर अर्धा कि.मी अंतरावरच पोलिसांनी तपासणी सुरू केली होती. पास व्यतिरीक्त एकाही व्यक्तीला आत सोडले जात नव्हते. मुख्य गेटकडेच गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करून त्याठिकाणाहुन प्रमुख व्यक्ती व माध्यमांच्या प्रतिनिधींना कार्यक्रम स्थळी आयोजकांनी आपल्या गाडीने नेले. तर प्रमुख लोकप्रतिनिधींच्या गाड्या मात्र कार्यक्रम स्थळापर्यंत सोडण्यात आल्या. काहींनी पायी चालतच कार्यक्रम स्थळ गाठले.

शिवसेना -भाजप कार्यकर्त्यांची घोषणा

विमानतळ लोकार्पण सोहळा कार्यक्रम दरम्यान नारायण राणे यांनी भाषणास सुरूवात करताच भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भाषणासाठी उभे राहताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केले. यावेळी घोषणांनी कार्यक्रम स्थळ दणाणुन गेले. पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सुचना करताच कार्यकर्ते शांत झाले.

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांना विमानाची प्रतिकृती भेट

सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रिय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण मंत्री अदिती तटकरे आदि प्रमुख मंडळींना जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत यांनी विमानाची प्रतिकृती भेट दिली.

आजपासुन विमानातुन नियमित प्रवासी वाहतुक

दोन दशकानंतर सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पुर्ण होवुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी विमानतळाचे उद्घाटन संपन्न झाले. पहिल्या दिवशी निमंत्रितांसाठी विमान ठेवण्यात आले होते. मात्र रविवार पासुन नियमित प्रवाशांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

Back to top button