अलिबाग; जयंत धुळप : जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राचे तापमान वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्यातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे समुद्रात कार्बोनिक अॅसिड मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. परिणामी, समुद्रातील ऑक्सिजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. धक्कादायक म्हणजे, काही भागांत झीरो ऑक्सिजन झोन निर्माण झाल्याने प्राणवायूअभावी मासे तडफडून मरत आहेत. त्यामुळे दुर्मीळ मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, समुद्रातील सुमारे 79 माशांच्या जाती धोक्यात आलेल्या आहेत.
रत्नागिरी येथील शासकीय मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्यजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी ही धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यांनी केलेल्या जीवशास्त्रीय विश्लेषणात समुद्रात वेगाने आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होत असलेल्या कार्बोनिक अॅसिडकडे लक्ष वेधले आहे. गेल्या काही वर्षांपासून समुद्रात येणार्या सेंद्रिय घटकांमध्ये (कुजणारे घटक) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात विविध प्राण्यांचे अवशेष, कचर्यातून येणारे, कुजणारे घटक यांचा समावेश आहे. या सेंद्रिय घटकांच्या समुद्रातील कुजण्याच्या प्रक्रियेत समुद्रातील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि त्याचवेळी या प्रक्रियेतून घातक अशा कार्बन डायऑक्साईड वायूची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. तयार होणारा हा कार्बन डायऑक्साईड आणि समुद्राचे पाणी एकत्र येऊन होणार्या रासायनिक प्रक्रियेतून समुद्रात कार्बोनिक अॅसिड तयार होते. परिणामी, सागरी मासे व जलचरांना त्याच्या श्वसन प्रक्रियेकरिता ऑक्सिजन अपुरा पडतो. याचवेळी कार्बन डायऑक्साईड वायू त्यांच्या जीविताला धोका पोहोचवतो. परिणामी, सागरी मासे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात वा मृत्युमुखी पडतात. त्यातून सागरी मत्स्य दुष्काळ निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.
कार्बोनिक अॅसिडमुळे मत्स्यनिर्मितीच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे समुद्रातील कोरल्स, प्लवंग आता नष्ट होऊ लागले आहेत. त्याचाही विपरीत परिणाम माशांवर होत आहे. या संपूर्ण रासायनिक प्रक्रियेमुळे समुद्रात अनेक ठिकाणी झीरो ऑक्सिजन झोन तयार झाल्याची निरीक्षणेदेखील विविध देशांतील संशोधकांनी नोंदविली असल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले.
विक्रमी प्रमाणात कमी मिळणार्या माशांमध्ये बोंबील, बांगडे, पापलेट, कोळंबी तसेच इतरही महत्त्वाच्या मासळीचा समावेश आहेच; पण सध्या नॉनटार्गेटेड फिश आणि बाय-कॅच म्हणजे नको असलेली कमी दर्जाची मासळी मिळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, यामध्ये काळतोंड्या (ट्रिगर फिश), केंड मासा, जेलिफिश, पॅरोट फिश, खटवी, असे जलचर मिळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले.
सन 2015-16 मध्ये राज्याचे सागरी मत्स्योत्पादन सुमारे 8 ते 10 लाख मे. टन होते. मात्र, त्यानंतर ते सातत्याने कमी होऊ लागले असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, सन 2020-21 मध्ये सागरी मत्स्योत्पादन 3.99 लाख मे. टन होते. त्यामध्ये 0.34 लाख मे. टनाने वाढ होऊन सन 2021-22 मध्ये हे मत्स्योत्पादन 4.33 लाख मे. टनांवर पोहोचले आणि काहीशी आशादायी परिस्थिती निर्माण होत आहे, असे चित्र असतानाच सन 2022-23 (जून पर्यंत) हे मत्स्योत्पादन 0.45 लाख मे. टन असल्याचे दिसून आले आणि मत्स्य घट सुरूच असल्याचे स्पष्ट झाले.