दापोली मतदारसंघातून ‘मविआ’चा उमेदवार निवडून येईल: संजय कदम | पुढारी

दापोली मतदारसंघातून 'मविआ'चा उमेदवार निवडून येईल: संजय कदम

खेड: पुढारी वृत्तसेवा : दापोली विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री रामदास कदम यांचे कोणतेही अस्तित्व नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, असा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी आज  (दि.२०) खेड येथे केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय कदम म्हणाले की, शिवसेना अडचणीत असताना कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे की, आपण शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. पण शिंदे गटाचे नेते रामदास कदम गद्दार आहेत. मी शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेल्यानंतर काम करताना प्रामाणिकपणे काम केले. राष्ट्रवादीने मला भरभरुन दिले. मी जसे बोलतो तसे करतो. जे स्वतः च्या भावाचे हॉटेल पाडायला गेले, दापोलीच्या सभेत गुहागरचा भावी आमदार विनय नातू असे सांगतात. तर खेडमधील सभेत सांगतात गुहागरचा भावी आमदार सहदेव बेटकर असेल. यातूनच रामदास कदम यांची भूमिका स्पष्ट होते. त्यांचे दापोली व गुहागर दोन्ही मतदारसंघात अस्तित्व नाही. रामदास कदम यांचा मुलगा दापोलीच्या मतदारसंघातून खा. अनंत गीते, संदीप राजपुरे अशा कुणबी समाजातील नेत्यांच्या पाठिंब्यामुळे निवडून आला आहे. त्यामुळे दापोली मतदारसंघात रामदास कदम यांची १० हजार देखील मते नाहीत.

माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झालेली नाही

कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेना प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेईन. माझी उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक झालेली नाही. मला आगामी काळात या मतदार संघाच्या भवितव्याच्या दृष्टीने एक माजी आमदार म्हणून विचार करणे माझे कर्तव्य आहे. मला यापूर्वी राष्ट्रवादीतून पूर्ण सहकार्य मिळाले आहे, असे कदम यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button