सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांच्या स्थावर मालमत्तांचे घेतले मोजमाप! | पुढारी

सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांच्या स्थावर मालमत्तांचे घेतले मोजमाप!

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (ठाकरे गट) आ. वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विभागाच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी शनिवारी आ. वैभव नाईक यांचा कणकवलीतील बंगला, हळवल येथील पाईप फॅक्टरी, कळसुली येथील क्रशर आणि शिरवल येथील फार्मसी कॉलेजच्या बांधकामांची मोजमापे घेतली. या सर्व स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन करून एसीबीला अहवाल सादर करण्याच्या सूचना सा.बां. विभागाला देण्यात आल्या आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले आ. वैभव नाईक यांच्यामागे त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना त्यांच्याकडील 2002 ते सप्टेंबर 2022 या कालावधीतील मालमत्तेचा स्त्रोत आणि उत्पन्नाबाबतचा तपशील सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात आ. वैभव नाईक यांनी प्रत्यक्ष रत्नागिरी येथील एसीबीच्या कार्यालयात जाऊन याबाबतचा जबाब नोंदवला होता. तसेच सर्व माहिती सादर केली होती. त्यानंतर आता एसीबीने आ. वैभव नाईक यांच्या स्थावर मालमत्तांची मोजमापे घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. त्यानुसार शनिवारी सा.बां. विभाग कणकवलीच्या उपअभियंता श्रीम. ए.के.प्रभू, शाखा अभियंता श्री. कांबळे आदींसह कर्मचार्‍यांनी आ. वैभव नाईक यांचा कणकवलीतील बंगला आणि इतर ठिकाणची बांधकामे यांचे मोजमाप घेतले.

यावेळी वैभव नाईक यांचे कर्मचारी त्यांच्यासोबत होते. तर आ. वैभव नाईक हे त्यांच्या कार्यालयात बसलेले होते. एसीबीच्या कोणत्याही चौकशीस आपण तयार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर सा.बां. विभागाच्या अधिकार्‍यांना विचारले असता ही पूर्णपणे गोपनीय बाब आहे. मालमत्तांचे मूल्यांकन करुन एसीबीला अहवाल सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता एसीबीची पुढील भूमिका काय असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Back to top button