सिंधुदुर्गातील आचरा येथे भव्यदिव्य १७ फूट उंच मारुतीच्या मूर्तीची स्थापना | पुढारी

सिंधुदुर्गातील आचरा येथे भव्यदिव्य १७ फूट उंच मारुतीच्या मूर्तीची स्थापना

आचरा; पुढारी वृत्तसेवा :  ऐतिहासिक रामेश्वर मंदिर, विस्तीर्ण समुद्रकिनारा समुद्रकिनारा यामुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या आचरे गावात आता नीलेश सरजोशी यांच्या संकल्पनेतून आचरा देवराई परिसरात साकारलेल्या श्री मारुतीच्या भव्य दिव्य १७ फूट उंचीच्या मूर्तीमुळे पर्यटनात आणखीन एक तुरा रोवला गेला आहे. आचरा पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.

बुधवारी सुवासिनींनी औक्षण केल्यानंतर पुरोहितांसह सचिन केळकर यांनी पंचगव्याने मूर्तीचे शुद्धीकरण करून कु. ऋग्वेद सरजोशी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मारुती स्तोत्र पठण करत मूर्तीची स्थापना करण्यात आली. या सोहळ्याला आचरा गावचे प्रमुख मानकरी विनीत मिराशी, रामेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन अवधूत हळदणकर, अरविंद सावंत, कपिल गुरव, मुकुंद घाडी, दशरथ घाडी, रमेश पुजारे, पवन पराडकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार विलास मांजरेकर व ओमकार मांजरेकर या पिता-पुत्रांनी ही मूर्ती तयार केली. त्यांचा नीलेश सरजोशी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

देवराई परिसरासह मूर्ती ठरेल पर्यटकांचे आकर्षण

आचरा मालवण टेंबली येथून काही अंतरावरच असलेल्या या परिसरात आचरा गावचे ग्रामोपाध्याय नीलेश सरजोशी यांच्या संकल्पनेतून देवराई परिसर बनविण्यात येत आहे. या भागात येत्या काही काळात श्री नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. देवराईतील दुर्मीळ औषधी वनस्पती, देव वृक्ष, नवग्रह मंदिर आणि साथीला नव्याने स्थापन करण्यात आलेली श्रीं ची ही भव्य आणि दिव्य मूर्ती भविष्यात पर्यटकांसाठी नक्कीच आकर्षण ठरणार आहे.

Back to top button