सिंधुदुर्ग : वानिवडेत सापडले मोठे कातळशिल्प | पुढारी

सिंधुदुर्ग : वानिवडेत सापडले मोठे कातळशिल्प

देवगड; पुढारी वृत्तसेवा : देवगडच्या कातळशिल्पांमध्ये वानिवडे गावात आतापर्यंतचे मोठे कातळशिल्प सापडले, अशी माहिती प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी दिली.

हिर्लेकर यांनी हे कातळशिल्प मांड या प्रकारातील असून त्याच्या बाजूला पूर्ण मानवी आकृती कोरलेली आहे. या आकृतीचा हाताला पहिल्यांदाच बोटे कोरण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. या आकृतीचे डोके वैशिष्ट्यपूर्ण असून पाच केंद्रबिंदू दाखविण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. यामुळे रत्नागिरीपासून देवगड मालवणपर्यंत दिसणार्‍या मानवी कातळचित्रात हे वैशिष्ट्यपूर्ण ठरावे असे आहे.

देवगड तालुक्यातील वानिवडे गावात कातळशिल्पे आहेत, याबद्दल तेथील डॉ. बाळासाहेब देसाई यांना कुतूहल होते. याबाबत गावात त्यांना चौकशी करताना त्यांचे मित्र इमरान साटविलकर यांनी कालवी-रहाटेश्वर भागात कातळशिल्पे आहेत, असे सांगितल्यानंतर डॉ. देसाई यांनी याबाबत शोधमोहीम हाती घेतली. कालवी-रहाटेश्वर गावातील रवी ठुकरूल यांनी त्यांना कातळशिल्पापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखविला. कातळशिल्प आडरानात असल्यामुळे दुर्लक्षित होते. गवत व गाळ साचून ते अस्पष्ट दिसत होते.

डॉ.देसाई यांनी त्यांचे सहकारी सुधीर ठुकरूल व दीपक दळवी यांच्या सहकार्याने कातळशिल्पाची साफसफाई केली. त्यांना डॉ.सीमा देसाई व संचिता देसाई यांनी मदत केली. कातळशिल्पाची साफसफाई केल्यानंतर प्राच्यविद्या अभ्यासक व देवगड इतिहास मंडळाचे सदस्य रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी कातळशिल्पाला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी व सर्वेक्षण केले.

मांड कातळ शिल्पाजवळ मातृदेवतेचे कातळचित्र देखील आहे. यात दोन पाय गुडघ्यापासून पावलांपर्यंत कोरलेले असून गुडघ्यावर ते एकमेकांना लहानशा पट्टीने जोडलेले आहेत, अशी माहिती हिर्लेकर यांनी दिली.

Back to top button