रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर ट्रकवर कार आदळून महिला ठार | पुढारी

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर ट्रकवर कार आदळून महिला ठार

नाणीज : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील इरमलवाडी येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका मालवाहू ट्रकवर समोरून येणारी कार आदळली. या धडकेत कार रस्त्याच्या कडेला फेकली जाऊन त्यातील महिला ठार व अन्य पाचजण गंभीर जखमी झाले. सुवर्णा शिवराम नागवेकर (वय 70) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक एमएच 09 सीए 3124 जयगडहून सोलापूरला चालला होता. या ट्रकचालकाचे नाव मंजुनाथ शिद्राय पाटील (38, रा. उंब्रज, ता. इंडी, जि. विजापूर) असे आहे. नाणीज येथील इरमलवाडी येथील वळणावर या समोरून येणार्‍या कारने (एमएच-01 डीपी-2658) ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ही कार रस्त्याच्या कडेला खाली फेकली गेली.

या कारमध्ये सहाजण प्रवास करत होते. हे सर्व जण साखरप्यावरून रत्नागिरीकडे लग्नासाठी चाललेले होते. यातील सुवर्णा शिवराम नागवेकर रा. वाडा वेसराड, फणसवणे (भंडारवाडी) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील हरिश्चंद्र वारंग, (65), हर्षदा हरिश्चंद्र वारंग (60), विक्रांत हरिश्चंद्र वारंग, (30), सुनील पेडणेकर (55), सुषमा सुनील पेडणेकर (5, सर्व रा. खारघर, मुंबई ) असे नावे आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच नाणीज येथील तरुण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. याच वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका तातडीने अपघातस्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालय दाखल केले. अधिक तपास पाली पोलिस ठाण्याचे हवालदार मोहन कांबळे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

नाणीज येथील इरमलवाडी येथे नेहमी अपघात होत असतात. या अपघातामध्ये अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. रत्नागिरी येथे चार नोव्हेंबर 2022 ला जनता दरबार झाला. त्यामध्ये राजन बोडेकर यांनी संबंधित अपघातग्रस्त वळण प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी महामार्गाच्या अधिकार्‍यानी तातडीने तेथे उपाययोजना करायला सांगितल्या होत्या. मात्र, पुढे त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही.

Back to top button