सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात सरपंच पदांसाठी १९६ तर सदस्य पदासाठी १०७३ अर्ज दाखल! | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात सरपंच पदांसाठी १९६ तर सदस्य पदासाठी १०७३ अर्ज दाखल!

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यात 54 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबर रोजी होणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 54 सरपंच पदांसाठी 196 तर 448 सदस्य पदांसाठी 1073 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. सोमवार 5 डिसेंबर रोजी या प्राप्त नामनिर्देशन पत्रांची सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत तहसीलदार कार्यालय येथे तीन टप्प्यात छाननी प्रक्रिया होणार असल्याची माहिती कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने कुडाळ येथील तहसीलदार कार्यालयात उमेदवारांची एकच झुंबड उडाली होती. यावेळी सरपंच आणि सदस्य पदाच्या उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. इच्छुक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नयेत आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून नामनिर्देशनपत्र पारंपरिक पध्दतीने म्हणजेच ऑफलाईन स्वीकारण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सायंकाळी  5.30 पर्यंत वाढविण्यात आली होती.

त्यामुळे तालुक्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची लगबग दिवसभर तहसीलदार कार्यालयात सुरू होती. सोमवार 5 डिसेंबर रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून, 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ज्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घ्यायचे आहे, त्यांना घेता येणार आहे.

तालुक्यातील तुळसुली तर्फ माणगांव, केरवडे तर्फ माणगांव, मांडकुली, बिबवणे, तेर्सेबांबर्डे, साळगांव, झाराप, पिंगुळी, हुमरस, शिवापूर, निवजे, घावनळे, नेरूर कर्याद नारूर, रानबांबुळी, गावराई, आंदुर्ले, चेंदवण, सरंबळ, परबवाडा पाट, बांव, केरवडे कर्याद नारूर, जांभवडे, पांग्रड, घोटगे, निरूखे, पडवे, तुळसुली कर्याद नारूर, हिर्लोक, ओरोस बुद्रुक, कवठी, वाडीवरवडे, सोनवडे तर्फ हवेली, कुंदे, आंब्रड, पुळास, कडावल, भरणी, सोनवडे तर्फ कळसुली, बांबुळी, कसाल, नारूर कर्याद नारूर, पावशी, वेताळबांबर्डे, डिगस, आवळेगांव ओरोस खुर्द, मुळदे, नेरूर देऊळवाडा, कालेली, माणगाव, तेंडोली, नानेली, आंबडपाल, पणदूर व अणाव या एकूण 54 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक  निवडणूक होत असून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

शुक्रवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्याबाबत आली. त्यानंतर सोमवार दि. 5 डिसेंबर रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 असून, ज्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचे आहेत, त्यांना या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर आवश्यक असल्यास मतदानाचा कार्यक्रम निश्चित होणार आहे. 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान होणार असून, त्यानंतर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहेत.

तीन टप्प्यात होणार छाननी

कुडाळ तालुक्यात होणाऱ्या ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची सोमवार ५ डिसेंबर रोजी ३ टप्प्यात छाननी होणार आहे. सकाळी ११ ते १२.३० वा. या वेळेत तुळसुली तर्फ माणगाव, तेर्सेबांबर्डे, झाराप, हुमरस, निवजे, रानबांबुळी, आंदूर्ले, सरंबळ, बाव, जांभवडे, निरुखे, तुळसुली कार्याद नारूर, वाडीवरवडे, कडावल, कसाल, वेताळबांबर्डे, आवळेगाव, नेरूर देऊळवाडा, माणगाव, पणदूर, पिंगुळी, दुपारी १२.३० ते दुपारी २ वा. या वेळेत केरवडे तर्फ माणगाव, साळगाव, नारूर क. नारूर, घावनळे, पडवे, कवठी, परबवाडा पाट, बांबुळी, पुळास, पांग्रड, भरणी, ओरोस बुद्रुक, आंब्रड, सोनवडे तर्फ कळसुली, पावशी, डिगस, मुळदे, कालेली, तेंडोली, अणाव, दुपारी २ ते ३ वा. या वेळेत मांडकुली, बिबवणे, शिवापूर, गावराई, चेंदवण, सोनवडे तर्फ हवेली, केरवडे कार्यात नारूर, घोटगे, हिर्लोक, कुंदे, अंबडपाल, नानेली, नेरूर कर्याद नारूर अशाप्रकारे छाननी होणार आहे, अशी माहीती तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली.

हेही वाचा;

Back to top button