मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस, अणाव ग्रामपंचायतींचा गौरव! | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस, अणाव ग्रामपंचायतींचा गौरव!

कुडाळ (सिंधुदुर्ग), पुढारी वृत्तसेवा : महाआवास अभियान 2020-21 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या संस्था व व्यक्तीमध्ये राज्यपातळीवर कुडाळ तालुक्यातील वाडोस व अणाव ग्रामपंचायती या राज्यपातळीवर द्वितीय क्रमाकांच्या मानकरी ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतींना गुरुवारी (दि.२४) मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत अमृत महाआवास अभियान 2022- 23 च्या शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 कालावधीत अमृत महाआवास अभियान  2022- 23 राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य संचालक राजाराम दिघे इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमादरम्यान महाआवास  अभियान 2020-21 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या संस्था व व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

राज्यपातळीवरील पुरस्कारासाठी राज्यस्तरीय अभियान अंमलबजावणी नियंत्रण मूल्यमापन समितीने ही निवड केली आहे. हा पुरस्कार पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण, वाडोस सरपंच संजना म्हाडगुत, ग्रामविकास अधिकारी मयुरी बांदेकर, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव सावंत, अणाव ग्रामपंचायत सरपंच नारायण मांजरेकर व ग्रामसेवक सुनील वारंग यांनी स्वीकारला.

महा आवास अभियान 2.0 मध्ये कुडाळ तालुक्याला जिल्हास्तरावर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजने अंतर्गत प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलेले होते. विशेष म्हणजे या घरकुलांना रोजगार हमी, जलजीवन मिशन उज्वला योजना, महाऊर्जा अशा विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आलेला आहे. तसेच या अभियानाचा भाग म्हणजे डेमो हाऊस बांधकाम करणे, कॉप शॉप सुरू करणे या सारखे लाभार्थीमिमुख उपक्रम प्राधान्याने पुर्ण करण्यात कुडाळ तालुका प्रथम क्रमांकावर आहे.

अधिक वाचा :

Back to top button