सिंधुदुर्ग : मालवणात सापडला बांगडा, तारलीचा बंपर कॅच | पुढारी

सिंधुदुर्ग : मालवणात सापडला बांगडा, तारलीचा बंपर कॅच

मालवण; पुढारी वृत्तसेवा :  मालवण-वायरी येथील पारंपरिक मच्छीमारांच्या रापणीला बंपर मासळी सापडली आहे. मासेमारीच्या पहिल्याच हंगामात तारली आणि बांगडे मुबलक प्रमाणात मिळाल्याने मच्छीमार बांधवांमधून समाधानाचे वातावरण आहे. दोन्ही प्रकारची मिळून सुमारे 13 ते 15 टन मासळी मिळाल्याचे वायरी येथील पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले.

यांत्रिक मासेमारीच्या आक्रमणामुळे आणि हवामानातील बदलांमुळे पारंपरिक मासेमारीला चांगल्या प्रमाणात मासळी मिळणे दुर्लभ बनले आहे. अशा स्थितीत मासळीच्या या बंपर कॅचमुळे मच्छीमारांच्या चेहर्‍यावर आनंद पसरला आहे. ही दुर्मीळ घटना आहे. जवळपास तीन वर्षांच्या कालावधीनंतर ही बंपर मासळी मिळाल्याने आम्ही सर्वच आनंदी आहेत, असे सिंधुदुर्ग जिल्हा रापण संघटनेचे सचिव दिलीप घारे यांनी सांगितले.

घारे म्हणाले, महाराष्ट्रातील एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 108 रापण असोसिएशन असून, या माध्यमातून 27 हजार कुटुंबे आपले पोट भरत आहेत. मालवणमध्येच 56 रापण संघ आहेत, ज्यात 10 ते 12 हजार लोक समाविष्ट आहेत. सिंधुदुर्ग किनारीपट्ट्यात पारंपरिक मासेमारी व्यवसाय हळूहळू कमी होत असताना, बेरोजगार असलेल्या अनेकांसाठी हाच व्यवसाय आशेचा किरण आहे.
दरम्यान, मालवण येथील मासळी स्थानिक बाजारपेठेत विकली जाते; परंतु त्यातील बहुतांश मासळी बंगळूर, हुबळी, गोवा या शहरांमध्ये पाठवली जाते.

Back to top button