रत्नागिरी : चिपळूणच्या राजकीय मैदानात तिसरी आघाडी; काँग्रेसचा हात होणार बळकट | पुढारी

रत्नागिरी : चिपळूणच्या राजकीय मैदानात तिसरी आघाडी; काँग्रेसचा हात होणार बळकट

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळुणात नगरपालिका निवडणुकांसाठी राजकीय मैदानात स्वतंत्रपणे तिसरी आघाडी उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तिसर्‍या आघाडीच्या बळकटीसाठी काँग्रेस पक्षाचा हातभार लागण्याची राजकीय चिन्हे दिसू लागली आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याबाबत संदिग्धता असली तरी चिपळुणातील पक्षांतर्गत राजकारण मात्र हळूहळू तापू लागले आहे. सद्यस्थितीत राज्यातील सरकारमधून पायउतार झालेल्या आघाडीतील घटक पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचे संकेत सर्वच पक्षातील प्रमुखांनी दिले असले तरी काँग्रेसकडून मात्र स्थानिक पातळीवर त्या विषयात ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेण्यात आली आहे. चिपळुणात राजकीय घडामोडींचा अंदाज घेतला असता नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या हातात हात घालून तिसरी आघाडी लढविण्यास सज्ज झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी व ठाकरे सेना एकत्र लढण्याचे संकेत मिळत असून, भाजपकडून शिंदे गटाला बळ दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

चिपळुणातील सर्वच राजकीय पक्षातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांची महाविकास आघाडी एकत्रितपणे रिंगणात उतरण्यासाठी तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठका काही टप्प्यापर्यंत सकारात्मक होत्या. मात्र, काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाची मागणी हा विषय कायम चर्चेत असल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्ष बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

नगराध्यक्ष पद आरक्षण जाहीर झाल्यावर उमेदवार सेनेचा की राष्ट्रवादीचा या विषयावर पुन्हा चर्चेसाठी नेत्यांच्या बैठका होणार आहेत. दुसरीकडे मात्र चिपळुणातील भाजप नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. शहरात पाहिजे तसे भाजपच्या बाजूने समर्थन करणारे वातावरण अद्यापही तयार झाले नसल्याने शिंदे गटाबरोबर आघाडी करून भाजप सत्तेत येण्यासाठी शिंदे गटाला बळ देत आहे. चिपळूणच्या या राजकीय रिंगणात न.प. निवडणुकीसाठी तिसरी आघाडी मैदानात उतरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसहीत भाजप, शिंदे गट, शिवसेनेतील काही इच्छुकांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी राहात आहे. या तिसर्‍या आघाडीला काँग्रेस पक्षाच्या ताकदीचा हात मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीतील उमेदवार व निवडणूक नियोजनावरून कार्यकत्यार्र्ंमध्ये संभ्रमावस्था आहे. निवडणुकीची सुत्रे माजी आमदार रमेश कदम की आमदार शेखर निकम यांच्या हातात जाणार या विषयावरून संभ्रम निर्माण झाले आहेत.

Back to top button