रत्नागिरी : मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल | पुढारी

रत्नागिरी : मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

खेड: पुढारी वृत्तसेवा : मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात मागासवर्गीय निधीच्या गैरवापर प्रकरणी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयात केलेला अटक पूर्व जमीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे, अशी माहिती त्यांच्या वतीने ॲड. आश्विन भोसले यांनी आज (दि.५)  दिली.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी, २३ फेब्रुवारी २०१५ रोजी वैभव सदानंद खेडेकर यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन, रत्नागिरी यांना खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी ते बौध्दवाडी रोटरी शाळेकडील रस्त्यावर नदी पलीकडे जाण्यासाठी विशेष घटक योजनेअंतर्गत साकव मंजूर करावा, असे विनंती पत्र दिल्यानंतर साकव मंजूर झाले होते. दरम्यान, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी तपासणीसाठी ३१ सदस्यीय समिती गठीत केलेली होती. त्या समितीने २० ऑक्टोबर २०२१ रोजी भरणे येथे जाऊन साकव बांधकामाची पाहणी केली होती. यावेळी या साकवाचा उपयोग भडगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामधील ६ अनुसुचित वस्त्यांना तसेच भरणे ग्रामपंचायत क्षेत्रातील एका अनुसुचित वस्तीला होत नसल्याचे आढळून आले होते.

भरणे ग्रामपंचायतीने खोटा प्रस्ताव सादर करून सार्वजनिक बांधकाम विभागाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आले होते. तसेच या साकवाचा वैभव खेडेकर यांच्या स्वतःच्या जागेत जाण्यासाठी उपयोग होत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे स्वत:च्या फायद्याकरीता अधिकाराचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करून शासकीय मान्यतेसाठी अटी व शर्थीचा भंग केला व साकव बांधकामाबाबत विशेष घटक योजनेच्या २० लाख रुपये निधीचा खेडेकर यांनी दुरुपयोग केल्याचे आढळून आले. त्यामुळे समाज कल्याणचे सहायक आयुक्त इरबा गायकवाड यांनी वैभव खेडेकर यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 खेडेकरांना अटक पूर्व जामीन मंजूर

या प्रकरणी वैभव खेडेकर यांनी खेड अतिरिक्त न्यायालयात अटक पूर्व जमीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर शनिवारी (दि.५) सुनावणी झाली. याबाबत माहिती देताना खेडेकर यांच्या वतीने बाजू मांडणारे  ॲड. आश्विन भोसले यांनी सांगितले की, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी खेडेकर यांच्याविरोधात राजकीय व फौजदारी गुन्हे दाखल असल्याने जमीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु खेडेकर यांच्या वतीने आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खेडेकर यांना न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button