रत्नागिरी : जि. प. चे विद्यार्थी आता ‘स्वच्छता मॉनिटर’ | पुढारी

रत्नागिरी : जि. प. चे विद्यार्थी आता ‘स्वच्छता मॉनिटर’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून लेटस चेंज हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. या उपक्रमात पाचवी ते आठवीमधील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळा तसेच परिसरातील गावांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

सध्या ग्रामीण व शहरी भागांत कचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गावोगावी ऐरणीवर आला आहे. कचरा गोळा करणारी यंत्रणा सर्वच ठिकाणी नसल्याने जवळच्या परिसरात, रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, ओढे, नदी नाल्यावरील पूल या ठिकाणी कचरा दिसून येत आहे. त्यामुळे कचरा गोळा करणार्‍या यंत्रणेवर खूप मोठा ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमांतर्गत निष्काळजीपणे कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणार्‍या नागरिकांना स्वच्छता मॉनिटर झालेले विद्यार्थी त्यांचे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगणार आहेत.

कचरा कुंडीमध्ये टाकण्यासाठी नागरिकांना आवाहन करणार आहेत. स्वच्छतेबाबत नियमितपणे प्रचार व प्रसार केल्यामुळे निष्काळजीपणे कचरा करणार्‍यांच्या सवयीमध्ये बदल होऊन परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लेटस चेंज हा 75 मिनिटांचा मनोरजंनात्मक चित्रपट दाखवण्यात येणार आहे. शाळांमध्ये स्वच्छता मॉनिटरची निवडही करण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्टीत हे स्वच्छता मॉनिटर गावात निष्काळजीपणे कचरा करणार्‍यांना त्यांची चूक निदर्शनास आणून देणार आहेत. यामुळे गावात कचरा टाकणार्‍यांवर त्यांचा वॉच असणार आहे.

उत्कृष्ट मॉनिटरचा होणार सत्कार

यावेळी त्यांना आलेल्या अनुभवाचे वर्णन स्वच्छता मॉनिटर हा हॅशटॅग लावून ते स्वत: किंवा त्यांचे पालक अथवा शिक्षक सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या स्वच्छता मॉनिटरचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले.

Back to top button