सिंधुदुर्ग : भात खरेदीसाठी 2 हजार 40 रु. दर निश्चित | पुढारी

सिंधुदुर्ग : भात खरेदीसाठी 2 हजार 40 रु. दर निश्चित

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : भात विक्री ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकर्‍यांना पुन:श्च गुरुवार, 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सन 2022-23 मध्ये खरीप पणन हंगामासाठी शासनाने एफ.ए.क्यू प्रतीच्या धान (भात) खरेदीकरिता 2 हजार 40 प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. भात विक्री शेतकर्‍यांनी हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे. जे शेतकरी भात विक्री करणार आहेत, त्यांनी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात यावी, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ए. एस. देसाई यांनी दिली.

जिल्ह्यात 41 ठिकाणी धान (भात) विक्री नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली असून, यापूर्वी नोंदणीसाठी शुक्रवार, 21 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि, नोंदणीसाठी शेतकर्‍यांना पुन:श्च गुरुवार, 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य शासनाच्या आधारभूत किंमत भात खरेदी योजनेसाठी दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता म्हणून खरेदीचे काम पाहत आहे.

Back to top button