गोव्यात सुरी हल्ला करून पसार झालेला संशयित दोडामार्ग येथून ताब्यात | पुढारी

गोव्यात सुरी हल्ला करून पसार झालेला संशयित दोडामार्ग येथून ताब्यात

दोडामार्ग ः पुढारी वृत्तसेवा :  गोवा येथे सुरी हल्ला करून गेल्या पंधरा दिवसांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीच्या गोवा पोलिसांनी दोडामार्गमधील एका लॉजमधून मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ब्रिजेश उर्फ बिट्टू काशिनाथ सावंत (30) असे असून तो गोव्यातील टार्जन गँगचा सदस्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

त्याच्यावर कळंगुट गोवा येथील रवी शिरोडकर याच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित बिट्टू हा दोडामार्गातील एका लॉजमध्ये मागील सहा ते सात दिवसांपासून वास्तव्यास होता. गोवा पोलिस त्याच्या मागावर होते. बिट्टू दोडामार्गात लपून बसल्याचा थांगपत्ता त्यांना लागला व सापळा रचून अखेर बिट्टूला शनिवारी पकडले. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खुनी हल्लाप्रकरणी  हणजूण पोलिसांनी आतापर्यंत 14 संशयितांना अटक केलेली असून 15 वा संशयित मनोज सिंग याच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट जारी केलेले आहे.

बिट्टू याच्याकडून या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार टारझन पार्सेकर याची हल्ल्यात वापरलेली ग्लांझा कार जप्त केली. या गाडीतून एक कोयती व 3 लाकडी दांडे जप्त कारण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या विरुद्ध आर्म्स अ‍ॅक्ट लावण्यात आला आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबीत सक्सेना, उपअधीक्षक जीवबा दळवी व हणजूण निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Back to top button