कुडाळ भाजी मार्केट मध्ये सापडल्या सव्वा पाच लाखांच्या बनावट नोटा! - पुढारी

कुडाळ भाजी मार्केट मध्ये सापडल्या सव्वा पाच लाखांच्या बनावट नोटा!

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा

कुडाळ भाजी मार्केट (मारुती मंदिर नजीक) मध्ये तब्बल ५ लाख २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कुडाळ पोलीस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी याची गंभीर दखल घेत घटनास्थळी आज ( दि. ७ ) पहाटे ५.३० वाजता प्रत्यक्ष भेट दिली.

खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व एटीएम सेंटरची पाहणी करण्याबाबत आपल्या यंत्रणेला सूचना दिल्या. मात्र शहरातील सर्व एटीएम सेंटर सुरक्षित असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याबाबत पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोकणातील गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. कुडाळ शहरातही नागरिकांची गर्दी वाढत असून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडू लागले आहेत, मंगळवारी सकाळीच कुडाळ भाजी मार्केट (मारुती मंदिर नजीक) मध्ये बेवारस स्थितीत दोन पिशव्यांमध्ये नोटा असल्याचे आढळून आले.

भाजीवाल्याने याबाबतची माहिती भाजप पदाधिकारी बंड्या सावंत यांना दिली. त्यानंतर बंड्या सावंत यांनी पोलिसांना याची कल्पना देताच कुडाळ पोलिस घटनास्थळी काही मिनिटांत दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही पिशव्यामधील शंभर रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या. याबाबत कुडाळ पोलीस स्थानकात तपास सुरू असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचले का? 

Back to top button