रत्नागिरी : सोने - चांदी व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ | पुढारी

रत्नागिरी : सोने - चांदी व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ठाणे येथील सोने – चांदीचे व्यापारी किर्तीकुमार अजय राज कोठारी (55,रा.भाईंदर मुंबई) यांचा खून करणार्‍या तीन संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने बुधवारी 1 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली. बुधवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. भूषण सुभाष खेडेकर (42,रा.खालची आळी,रत्नागिरी), महेश मंगलप्रसाद चौगुले (39,रा.मांडवी सदानंदवाडी,रत्नागिरी) आणि फरीद महामुद होडेकर (36,रा.भाट्ये,रत्नागिरी) अशी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.

यावेळी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकिल विद्यानंद जोग आणि शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी संशयित तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगून पोलीस कोठडीची मागणी केली. संशयितांमध्ये 18 ते 20 सप्टेंबर मोबाईलव्दारे सतत संपर्क होत होता. कोठारी यांचा खून केल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल, हातांमधील अंगठ्या आणि सोने-चांदीचा ऐवज काढून घेत संशयितांनी रिक्षातून आबलोली येथे त्यांचा पोत्यात बांधलेला मृतदेह टाकला. त्यानंतर संशयित श्रुंगारतळी-चिपळूण-वालोपे-धामणी-संगमेश्वर मार्गे रत्नागिरीत आले. येताना त्यांनी वालोपे आणि संगमेशवर येथे रिक्षात गॅस भरुन 1 लिटर डिझेल घेतले. तसेच संगमेश्वर पुलावरुन कोठारी यांची बॅग फेकल्याचे पोलिस तपासात संशयितांनी सांगितले. संशयितांनी कोठारी यांचा मोबाईल मत्स्यगंधा एक्सप्रेसमध्ये टाकून त्यांचे लोकेशन मुंबई येथील दाखवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो मोबाईल आता बंद झाल्याने त्याचे लोेकेशन मिळत नाही. तसेच भूषण खेडेकर याने कोठारी यांच्याकडील सोने वितळवून त्याची तयार केलेली लगड विकून 4 ते 5 जणांना पैसे देऊन आपली देणी भागवली त्यातील 3 जणांकडून 1 लाख 45 हजार रुपये आणि कोठारी यांच्याकडील चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

संशयितांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी श्रुंगारतळी ते रत्नागिरी हे 245 मैल अंतर तपासूनही कोठारी यांची बॅग मिळालेली नाही. त्यामुळे संशयित दिशाभूल करत असून कोठारी यांच्या हातांमधील अंगठ्यांबाबतही संशयित निट माहिती देत नूसन संशयितांचे काही कपडेही अजून हस्तगत करायचे बाकी आहेत. तसेच कोठारी यांचा मृतदेह बांधण्यासाठी दोरी, पोते कोठून खरेदी केला. सोने नेमके कोठे वितळवून लगड तयार केली हा सर्व तपास पूर्ण करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

दरम्यान, संशयितांतर्फे अ‍ॅड. मधुरा आठले आणि अ‍ॅड.आदेश चवंडे यांनी संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात येऊ नये अशी मागणी केली. संशयित पोलिसांना तपासात सहकार्य करत असल्याने सोन्याची लगड विकून मिळालेले पैसे पोलिसांना मिळालेले आहेत. सीसीटिव्ही फूटेजही पोलिसांनी हस्तगत केले असून कोठारी यांचा खून गळा आवळून केल्याने संशयितांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडलेले नसून ते हस्तगत करण्यासाठी पोलिस कोठडीची गरज नाही. सात दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिस कोठारी यांचा मोबाईल शोधण्यासाठी मुंबईला गेलेले नाहीत. तसेच संशयितांनी कोठारी यांच्या बॅगबद्दल माहिती दिलेली असून ती पोलिसांना मिळून येत नसेल तर यात संशयितांचा दोष काय? पोलिस कोठडीची मागणी करुन पोलिस कोणत्या दुसर्‍या पध्दीने बॅगचा तपास करणार आहेत. ते त्यांनी स्पष्ट केलेले नाही असा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांतर्फे करण्यात आला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी राहुल म.चौत्रे यांनी तीन्ही संशयितांच्या पोलिस कोठडीत 1 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली.

Back to top button