सिंधुदुर्ग : रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे कोकण-पश्चिम महाराष्ट्राच्या कनेक्टीव्हीटीवर परिणाम | पुढारी

सिंधुदुर्ग : रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे कोकण-पश्चिम महाराष्ट्राच्या कनेक्टीव्हीटीवर परिणाम

वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणा-या प्रमुख महामार्गांची चाळण झाली आहे. घाटमार्गात कोसळणा-या दरडी, कमकुवत संरक्षक भिंती यामुळे प्रवाशांना जीव मूठीत धरुन प्रवास करावा लागतो. प्रवास करताना जीवाला धोका व अपघाताला निमंत्रण देणाऱ्या खड्ड्यांमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या कनेक्टीव्हीटीवर परिणाम होत आहे.

सिंधुदुर्ग व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा तळेरे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे. करुळ घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंती, रस्त्यावर पडलेले खड्डे, खचलेल्या साईड पट्या तसेच पावसाळ्यात कोसळणा-या दरडी यामुळे महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग अनेक वेळ ठप्प होतात. मार्च महिन्यात या राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. घाटातील अवघड वळणावर तर रस्ता पूर्णपणे उखडला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील खड्डे दगड मातीने बुजवून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र तीही कुचकामी ठरली आहे.

तरेळे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था ग्रामीण रत्स्यांसारखी झाली आहे. वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून यावरुन सुमारे ३३ हजार मेट्रीक टन वाहतूक दररोज केली जाते. प्रवासी वाहानांसह अवजड व जड वाहतूकही याच मार्गाने मोठ्या प्रमाणात होते. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रशासनाविरोधात वाहनधारकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

भुईबावडा घाटमार्गाची अवस्था देखील दयनीय झाली आहे. घाटात ठिकठिकाणी संरक्षक भिंती, आधारभिंती ढासळलेल्या आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अरुंद व नागमोडी वळणे यामुळे  हा घाटमार्ग दिवसेंदिवस वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. वैभववाडी तालुक्यातील करुळ व भुईबावडा घाटमार्ग बंद असल्यास फोंडाघाट हा पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी महत्वाचा पर्यायी घाटमार्ग आहे. मात्र याही मार्गाची अवस्था बिकट झाली आहे.

आरोग्य, शिक्षण, व्यापार यासाठी कोकण हे ब-याच प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे. यासाठी दळणवळण खूप महत्त्वाचे आहे.  या दळणवळणासाठी रस्ते वाहतूक हा एकच पर्याय आहे. मात्र गेल्या काही वर्षात कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणा-या राज्यमार्गांची दुरावस्था झाली आहे. याचा नाहक त्रास कोकणवासीयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची व मार्गावर करुळ, भुईबावडा व फोंडा घाट मार्गांची दुरुस्ती व मजबूतीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button