रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव निर्माण करणार भगवा झंझावात

रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव निर्माण करणार भगवा झंझावात
Published on
Updated on

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव गणेशोत्सवानंतर संपूर्ण कोकणपट्ट्यात भगवा झंझावात निर्माण करण्यासाठी मंडणगड ते तळकोकणात दौरा करणार असून शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या कोकणातील ताकद पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी गणेशोत्सवानंतर आ. जाधव रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून दौर्‍यास प्रारंभ करणार आहेत.

शिवसेना म्हटली की, डरकाळी फोडणारा वाघ, भगवा ध्वज आणि धनुष्यबाण अशी त्रिसुत्री मनात पक्‍की घर करून राहिलेला कोकणातील मतदार नागरिक जनतेला पुन्हा एकदा एकत्र करून सेनेला बळकटी देण्यासाठी सेना नेते आ. जाधव यांनी गणेशोत्सवानंतर दौरा करण्याचे नियोजन केले आहे. चार दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ. जाधव यांची सेना नेते म्हणून निवड केल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांत शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात आघाडी शासन पायउतार झाल्यावर शिवसेना कोणाची यासह शिवसेनेचे चिन्ह, भगवा आदी विषयांवर गेले दोन महिने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दावा करणार्‍या दोन्ही बाजूंकडून कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्यातून पळवाटा व मार्ग काढण्यासाठी दोन्ही गटांकडून डावपेच सुरू झाले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आपली राजकीय कारकीर्द भगव्यापासून सुरू करणारे आ. जाधव यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना नेतेपदाची मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मिळताच आ. जाधव यांच्यातील मूळ शिवसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर शिवसैनिकांना एकत्र करून संघटना बळकटीसाठी राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्याचा श्री गणेशा कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करणार आहेत. गणेशोत्सव झाल्याझाल्या आ. जाधव या दोन्ही जिल्ह्यांत सामान्य शिवसैनिक कार्यकर्त्यांपासून पदाधिकार्‍यांच्या गाठीभटी घेऊन बैठका घेणार आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागापासून शहरी भागातील सामान्य मतदारांसोबत हितगूज साधणार आहेत. आ. जाधव यांची सामान्यांमध्ये मिळसण्याची खास शैली व हातोटी शिवसेेनेला बळकटी देण्यासाठी फायदेशिर ठरणार आहे.

कोकण दौर्‍यानंतर ते रायगडपासून पुन्हा उर्वरित महाराष्ट्रात राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. राज्य व कॅबिनेट मंत्रिपदाच्या कालावधीत त्यांना राज्यातील अनेक तालुका व जिल्ह्यातील राजकीय वातावरण व परिस्थितीची जवळून माहिती मिळाल्याने त्याचा फायदा सेना बळकटीसाठी ते करून घेऊ शकतात. एकूणच नेतेपदी निवड झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी भगव्याचा झंझावात कोकणासहीत राज्यभर वाढविण्यासाठी दौर्‍याचे नियोजन केले आहे.

अस्वस्थ ते आक्रमक

शिवसेनेपासून शिवसेना संघटनेतील सामान्य कार्यकर्ता ते प्रमुख पदाधिकारी पासून दोनवेळा आमदार अशी सेनेत राजकीय कारकीर्द सुरू करणार्‍या आ. जाधव मध्यंतरात सुमारे एक तप शिवसेना विचारांशी न पटणार्‍या राष्ट्रवादीमध्ये गेले. संघटनाअंतर्गत कुरबुरीमुळे त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत सुरुवातीला स्वाभिमानी अपक्ष असा राजकीय लढा दिला. मात्र, काही काळातच त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जोरदार एन्ट्री केली. तेथे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला. परंतु मूळ शिवसेनेचा स्वभाव असल्याने ते कायमच अस्वस्थ दिसत होते. त्यांच्या आक्रमकपणातून पक्षिय राजकारणापेक्षा कुटुंब मानलेल्या सेनेत झालेल्या अन्यायाबाबत भावना व्यक्‍त होत होत्या. मात्र, सुमारे एक तपानंतर पुन्हा ते सन्मानाने सेनेत परतले आणि त्यांची मनातील अस्वस्था व घुसमट दूर झाली. कुटुंब मानलेल्या मूळ सेनेत परतल्यावर पुन्हा एकदा त्यांच्यातील आक्रमक शिवसैनिक जागा झाला आहे. असे असताना देखील ते ज्या पक्षाने मंत्रीपद दिले त्या पक्षातील नेत्यांच्या विरोधात आक्रमक न होता दोनवेळा युती म्हणून सत्तेत असलेल्या भाजप विरोधासहीत सेनेतून गटबाजी करून संघटना डळमळीत करणार्‍यांविरोधात भास्कर जाधव मात्र आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news