सावंतवाडी : माळीच्या घरात सातशे वर्षापासून राऊळ कुटुंबीय जोपासतात गणेशोत्सवाची परंपरा

सावंतवाडी : माळीच्या घरात सातशे वर्षापासून राऊळ कुटुंबीय जोपासतात गणेशोत्सवाची परंपरा
Published on
Updated on

सावंतवाडी; नागेश पाटील : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माळीच्या घरात सुमारे सातशे वर्षाहूनही अधिक काळ गणेशोत्सव सामूहिक पद्धतीने एकत्रित येवून साजरा केला जात आहे. यात ६५ पेक्षाही अधिक असलेल्या राऊळ कुटुंबांच्या सामुहिकतेतून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होतो. विशेष म्हणजे, आजही राऊळ कुटुंबियांनी ही अनोखी परंपरा जपली आहे

सोनुर्लीतील श्री. देवी माऊलीसह मळगाव येथील श्री. देव रवळनाथ, श्री. देव भूतनाथ, श्री. देव मायापूर्वचारी, श्री. देव दोन पूर्वस या चार देवस्थानांसह गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळख असणारे माळीचे घर. श्री. गणेशाच्या सातशे वर्षांच्या परंपरेमुळे मळगावसह सावंतवाडी तालुक्याचे धार्मिक भूषण म्हणून नावारूपास आले आहे.

आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवामध्ये परंपरा आणि भावनेची सुरेख सांगड घालून कोकण संस्कृतीचे नाव सातासमुद्रापार नेण्याचे काम कोकणातील लोकांनी केले आहे. गणेशोत्सवाची क्रेझ मनाच्या गाभाऱ्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्याचे एकमेव सुसंस्कृत आणि सुंदर ठिकाण म्हणून कोकण आणि यामध्येही विशेष अशा सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. कोकणात सुंदरवाडी अशी ओळख असणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माळीचे घरातील गणेशोत्सवाची परंपरा या संस्कृतीचीच प्रचिती आणून देणारी आहे.

सुमारे सातशे वर्षाहूनही अधिक काळ माळीच्या घरात गणेशोत्सव ६५ कुटुंबांच्या सामूहिकतेतून साजरा केला जातो. या कुटुंबियांकडून करण्यात येणारी गणेशोत्सवाची पूर्वतयारी, गणेशाच्या कालावधीतील भक्तीमय कार्यक्रम हे प्राचीन भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीच्या उत्तम उदाहरणाचा दाखला देणारी आहे. सोनुर्लीतील श्री. देवी माऊलीसह मळगावातील श्री. देव रवळनाथ, श्री. देव भूतनाथ, श्री. देव मायापूर्वचारी, श्री. देव दोन पूर्वस या चार देवस्थानांसह 'माळीचे घर' मळगाव येथील पाचवे देवस्थान म्हणून नावारूपास आले आहे. वास्तविक हे पाचवे देवस्थान माळीच्या घरातील मानकऱ्यांनी, सर्व कुटुंबियांनी मनाच्या अंतर्भावाने जागृकतेने जोपासले आहे.

सावंतवाडी शहराच्या पश्चिम सीमेला लागून असणारे मळगाव हे गाव येथील रेल्वे स्थानकामुळे देशाच्या नकाशावर रेखाटले आहे. या गावात दहा वाड्यांचा समावेश असून लोकसंख्या सुमारे सहा हजाराच्या आसपास आहे. गावाच्या उत्तर दिशेला माळीचे घर वसले असून या परिसरात राऊळ कुटुंबांची जवळपास सहाशेच्या आसपास लोकवस्ती आहे. या कुटुंबियांमधील प्रत्येक घरातील किमान निम्मे तरी कामानिमित्त पुणे-मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त विभागलेली ही भावंडे होळीपौर्णिमा, नागपंचमी, अष्टमी आणि गणेशोत्सव अशा चार उत्सवाला एकत्र येतात. या तिन्ही उत्सवांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी या तिन्ही उत्सवातील भेटीमध्ये राऊळ बांधवांकडून होत असते. त्यामुळे गणेशाच्या तयारीसाठी आवश्यक सर्व गोष्टींची कसलीही घाई गडबड वा गोंधळ न करता अगदी नियोजनबद्धरीत्या तयारी केली जाते. गणेशोत्सव सण राऊळ कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घरातील लहान मोठी मंडळी सहभागी होऊन अगदी पारंपारिक पद्धतीने केला जातो.

गणेशोत्सवाच्या अगोदर येणाऱ्या पौर्णिमेला मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती आणली जाते आणि चतुर्थीपूर्वीच्या आठवड्यात मूर्ती साकारण्यास सुरुवात केली जाते. ही मूर्ती राऊळ बांधवांतील ज्येष्ठ मंडळी आजही आपल्या हाताने तयार करतात. तसेच मूर्ती बनविताना या कुटुंबातील तरुण मंडळी तसेच मूर्ती कामाची आवड असलेली लहान मुलेही मूर्ती बनविण्यासाठी हातभार लावतात. तयार झालेल्या गणेश मूर्तीला चतुर्थीच्या आदल्या दिवशी रंगविले जाते. तर मूर्तीच्या डोळ्यांची नजर चतुर्थीच्या पहाटेला पारंपरिक कारागिरांकडून दिली जाते, हे या गणपतीचे एक खास वैशिष्ट्य आहे. माळीच्या घरातील गणेशोत्सव हा पारंपरिक सात दिवसांचा असतो. तरी या घराच्या गाभाऱ्यातही श्री. गणेशाचीच मुर्ती आहे आणि मुख्य म्हणजे, या घरामध्ये सर्वजण एकत्र येऊन रोज सायंआरती करतात.

पहिल्या दिवशी म्हणजे, मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेशाचे विधिवत पूजन झाल्यावर गणेशाला या कुटुंबियांकडून वेगवेगळ्या सात प्रकारचा नैवेद्य दाखविला जातो आणि यातूनच सामुहीक भोजनाचा आनंदही लुटला जातो. शिवाय या घरातील प्रत्येक कुटुंबियांकडून गणेशाला आपल्या आवडीचाही नेवैद्य दाखविला जातो. उत्सवाच्या सात दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतल्या जातात. घरातील सर्व कुटुंबातील महिला एकत्र येत रोज गणपतीसमोर विविध प्रकारच्या फुगड्या घालतात. याशिवाय रोज सायंकाळी आरतीनंतर भजन व शेवटच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे सातही दिवस संपूर्ण घरात भक्तीमय वातावरण पसरलेले असते.

सातही दिवस या घरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांत ज्येष्ठ, तरुण मंडळींसह घरातील लहान मुलेही आनंदाने सहभागी होत असतात. सातव्या दिवशी चोवीस जणांच्या आधाराने श्रींचे भक्तीमय वातावरणात ढोल- ताशांच्या गजरात विसर्जन केल्यानंतर सामुहिक भोजन करतात. आणि यानंतर हे बांधव पुढच्या भेटीचे नियोजन करून आपापल्या कामासाठी मार्गस्थ होतात. सात दिवस आपल्या लाडक्या देवाची सेवा केल्यानंतर निरोपाच्या वेळी सद्गदित भावनेने पुन्हा पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची आस उराशी बाळगूनच गावातील वेस ओलांडतात.

चतुर्थीच्या पहाटेला अवतरते श्रींची नजर

माळीच्या घरातील गणपतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, येथील मूर्तीचे रूप अखंडितरित्या आहे तसेच ठेवले आहे. शिवाय मूर्ती मातीची तसेच सहज केली जाते. तर तयार मूर्तीची नजर (डोळे) ही पारंपरिक कारागिरांकडून चतुर्थीच्या पहाटे साकारली जाते.

आनंद सात नेवैद्याचा- सामुहिक भोजनाचा

मळगाव गावातील मानाचा गणपती म्हणून नावारूपास आलेल्या गणपतीला राऊळ कुटुंबीयांकडून सात प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात, आणि या नेवैद्यातूनच सामुहिक भोजनाचा आनंद हे बांधव लुटतात. त्यामुळे माळीच्या घराचा वारसा कायम एकोप्याने जोपासला जातो.

मळगाव पंचक्रोशीतील पाचवे मंदिर

मळगाव पंचक्रोशीत भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून सोनुर्ली येथील श्री. देवी माऊली, मळगाव येथील देव रवळनाथ, देव भूतनाथ, देव मायापूर्वचारी, देव दोन पूर्वस यांचे स्थान आहे. यानंतर माळीच्या घराच्या भक्तिमय वारसाने 'माळीचे घर' हे मळगाव येथील पाचवे देवस्थान निर्माण झाले असून पंचक्रोशीत त्याचा वेगळा नावलौकिक निर्माण झाला आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news