देवगड : उद्योग उभारणीसाठी 250 कोटींपर्यंत कर्ज! | पुढारी

देवगड : उद्योग उभारणीसाठी 250 कोटींपर्यंत कर्ज!

देवगड; पुढारी वृत्तसेवा : कोकणातील तरुणांना उद्योग उभारण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालयामार्फत एक कोटीपासून 250 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध करू, तसेच जिल्ह्यात उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करू, अशी ग्वाही केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली. देवगड तालुक्यात शिरगाव, तळेबाजार, जामसंडे, देवगड, कुणकेश्वर, मिठबांव येथे त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. स्वागत दौर्‍यामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती, जनतेचा आशीर्वाद व आश्वासन देऊन स्वागत स्वीकारले. मात्र, कोणावरही टीकाटिप्पणी करण्याचे टाळले. दरम्यान, जनआशीर्वाद यात्रा शिवसेना संपर्क कार्यालयासमोर येताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी कणकवली येथून देवगड तालुक्यात दाखल झाली. शिरगावमध्ये ना. राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पाऊस असूनही मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.त्याप्रमाणे तळेबाजार येथेही स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजीत ना.राणे यांचे स्वागत केले. राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा जल्लोषी घोषणा देत कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडले.

जामसंडे येथेही त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ना. नारायण राणे म्हणाले, आपण जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असून देशाला प्रगतीकडे घेवून जाणारे, महासत्तेकडे वाटचाल करणारे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशवासीयांना लाभले आहे, याचा आपणास गर्व व अभिमान असला पाहिजे. मला मंत्रीपद देवून त्यांनी कोकणच्या सुपूत्राला केंद्रामध्ये काम करण्याची संधी दिली. या संधीचा उपयोग मी कोकणच्या विकासासाठी करणार आहे. सुक्ष्म, मध्यम ,लघू उद्योग खात्याचा माध्यमातून येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, उद्योग उभारणीसाठी 1 कोटी ते 250 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. युवावर्ग, बचतगट यांना उद्योग प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात लवकरच उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

भाजपा देवगड तालुका, देवगड- जामसंडे नगरपंचायत, सकल मराठा समाज तसेच विविध संघटना, ग्रामस्थ यांच्यावतीने ना.राणे यांचे स्वागत करण्यात आले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.कालीदास कोळंबकर, आ.आशीष शेलार, माजी आ. मधू चव्हाण, प्रमोद जठार, माजी खा निलेश राणे, आ. नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत, जि.प.सदस्या सौ.सावी लोके, भाजपा देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, पडेल मंडल अध्यक्ष डॉ.अमोल तेली, जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, सभापती रवी पाळेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, नगराध्यक्षा सौ.प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, सौ.तन्वी चांदोस्कर, दयानंद पाटील, अनिकेत बांदिवडेकर, लक्ष्मण उर्फ बाबू सावंत, पं.स.सदस्य, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.देवगड येथे ब्रह्मवृदांच्यावतीने आशिर्वाद मंत्राद्वारे मंत्रोच्चार करण्यात आले. कुणकेश्वर येथे भव्य स्वागत करण्यात आले.मिठबांव येथेही ना.राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.जि.प.सदस्या सौ.सावी लोके, माजी सभापती सुनील पारकर, मिठबांव सरपंच भाई नरे,शैलेश लोके आदींनी ना.राणे यांचे स्वागत केले.

जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणे यांना विजेचा सौम्य धक्का

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने शुक्रवारी रात्री कणकवलीत आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विजेचा सौम्य धक्का बसला. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जात असताना तेथील रेलिंगला केलेल्या विद्युत रोषणाईतील तोरणावर हात ठेवल्यानंतर विजेचा सौम्य धक्का राणे यांना बसला. त्यानंतर राणे यांनी ही बाब उपस्थितांच्या नजरेत आणून दिली. कोकणात आलेली भाजपची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी रात्री कणकवली
शहरात पोहोचली. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राणे यांच्या स्वागत व सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांनी सजविताना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सत्कार स्वीकारण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जात असताना तेथील रेलिंगवर राणे यांनी हात ठेवला असता विद्युत रोषणाईतील तारेचा स्पर्श होऊन त्यांना विजेचा सौम्य धक्का बसला. त्यांनी लगेचच सोबत असलेल्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना बाजूला केले. कणकवलीत शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता. विद्युत रोषणाईवर पाऊस पडल्याने त्यातून हा विजेचा धक्का बसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. विजेचा धक्का सौम्य असल्याने राणे यांना कोणतीही इजा पोहोचली नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांना एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था असतानाही सुरक्षा यंत्रणेने याची अगोदर तपासणी करायला हवी होती, असे मत नागरिकांनी नोंदवले आहे.

Back to top button