कणकवलीत भाजप-शिवसेना आमने सामने | पुढारी

कणकवलीत भाजप-शिवसेना आमने सामने

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी रात्री उशिरा कणकवलीत पोहोचली. या यात्रेचे पटवर्धन चौकात स्वागत झाल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ना. राणे नरडवे नाकामार्गे ओम गणेश निवासस्थानी जात असताना नरडवे नाका येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी समोरच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ जमलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिवसेना-भाजपमधील राडा टळला. याबाबत पोलिसांनी मनाई आदेशाचा भंगप्रकरणी शिवसेनेचे आ. वैभव नाईक, भाजपचे आ. नितेश राणे यांच्यासह शिवसेनेच्या 15 ते 20 जणांविरुद्ध आणि भाजपच्या 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

शुक्रवारी रात्री जनआशीर्वाद यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून नरडवे नाक्याकडे सरकल्यानंतर आ. नितेश राणे, माजी खा. नीलेश राणे, संदेश सावंत यांच्यासह प्रमुख भाजप पदाधिकारी नरडवे नाक्याकडे चालत आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस
बंदोबस्तही तैनात होता. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी ‘कोण आला रे कोण आला, कोकणचा वाघ आला …नारायण राणे तुम आगे बढो…हंम तुम्हारे साथ है… नारायण राणे अंगार हे बाकी सब भंगार है… आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय’ अशा घोषणा दिल्या. या घोषणा सुरू असतानाच पलीकडे कार्यालयाजवळ उभे असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांकडून त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो… उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है… हमारा नेता कैसा हो वैभव नाईक, संदेश पारकर जैसा हो … हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा’… अशा घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले होते. कोणत्याही क्षणी काय होईल हे सांगता येत नव्हते. मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे हातघाईचा प्रसंग टळला.

मुख्यमंत्रीविरोधी राणेंचे वक्तव्य आणि नंतर राणेंना झालेली अटक या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे कणकवलीत यात्रा पोहोचल्यानंतर ती शांततेत पार पडेपर्यंत पोलिसांसमोरही मोठे आव्हान होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळपासूनच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते नरडवे नाकायेथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. त्यामुळे पोलिसांनी दोन्हीबाजूने कडे केले होते. शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने येवू नयेत याची पूरेपूर दक्षता घेतली होती. अखेर पोलिसांच्या चोख बंदोबस्त आणि नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नरडवे नाका येथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली मात्र नंतर ही यात्रा राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी पोहोचली आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

दरम्यान कणकवली पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना-भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये शिवसेनेचे आ. वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, कन्हैया पारकर, राजू राठोड यांच्यासह 15 ते 20 जणांविरूद्ध तर भाजपचे आ. नितेश राणे, निलेश राणे, समीर नलावडे यांच्यासह 40 ते 45 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याबाबतच्या फिर्यादी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे आणि पोलिस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी दिल्या.

Back to top button