रत्नागिरी : शिवसेनेकडून भाजपचा विश्वासघात : अजयकुमार मिश्रा | पुढारी

रत्नागिरी : शिवसेनेकडून भाजपचा विश्वासघात : अजयकुमार मिश्रा

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीनंतर सत्तास्थापने वेळी शिवसेनेने जनादेशाची अवहेलना करून राष्ट्रवादी व काँग्रेससोबत आघाडी केली. सेनेने भाजपशी येथील जनतेशी विश्वासघात केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा स्वार्थ होता. उद्धव ठाकरे बोलतात म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असे नाही ते काही देव नाहीत. भाजपाने कधीही धोका दिला नसल्याचे केेंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गसह राज्यातील सोळा लोकसभा मतदारसंघात विकासात्मक आणि संघटनात्मक स्थिती मजबुतीसाठी भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा प्रवास योजनेच्यानिमित्ताने रत्नागिरीत आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की गतवेळी निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली. त्यावेळी शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचे कोणतेही आश्वासन दिले गेले नव्हते. मात्र, चुकीचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे भीतीपोटी आता भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

लोकसभा मतदारसंघात फिरताना भाजपाला चांगले वातावरण असल्याचे जाणवले. त्यामुळे पुढील निवडणुकीत विधानसभेतील सहाही जागा आणि लोकसभेची जागाही भाजप जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरीत आल्यावर आपण जिल्हाधिकार्‍यांनी विविध केंद्रीय योजनांबाबत माहिती घेतली. यावेळी रिफायनरीसंदर्भात स्थानिक आपल्याला भेटले. त्यावेळी सत्तेतील मित्रपक्षाने विरोध केल्यामुळेच हा प्रकल्प रखडला आहे. यापुढील कालावधीत रिफायनरी होण्यासाठी स्थानिकांनी विश्वासात घेऊन तो मार्गी लावला जाईल, असेही अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दीपक पटवर्धन, मा. आमदार राजन तेली, माजी आमदार बाळ माने, अतुल काळसेकर, अ‍ॅड. बाबासाहेब परुळेकर, सचिन वहाळकर उपस्थित होते.

रत्नागिरी विमानतळ प्रश्न 90 टक्के सुटला

रत्नागिरीतील विमानतळाचा प्रश्न 90 टक्के सुटला आहे. हा विमानतळ सध्या कोस्टगार्डच्या ताब्यात आहे. त्यामुळे संरक्षण दृष्ट्या काही गोष्टी करणे अद्याप शिल्लक आहेत. त्या गोष्टीही लवकरच पूर्ण होतील. मागील राज्य सरकारने जागेच्या विषयात विलंब केला होता. आता हे सर्व प्रश्न सुटतील, असेही ना. अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.

Back to top button