सिंधुदुर्ग : सातोळी-बावळट तिठा पावणेदोन लाखांची दारू जप्त | पुढारी

सिंधुदुर्ग : सातोळी-बावळट तिठा पावणेदोन लाखांची दारू जप्त

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा :  सातोळी- बावळट तिठा येथे जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने अवैध दारू वाहतूक करणार्‍या एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 1 लाख 72 हजार 800 रुपये किंमतीची गोवा दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी विठ्ठल आशियेकर (रा. बार्देश-गोवा) याला टेम्पोसह ताब्यात घेत त्याच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस फौजदार अजित घाडी, हवालदार दळवी, हवालदार सापळे, पोलिस नाईक मयूर सावंत आदींनी ही कारवाई केली. 7 ऑगस्ट रोजी सातोळी-बावळाट येथे कर्तव्य बजावताना या पोलिस कर्मचार्‍यांनी या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोचालक विठ्ठल आशियेकर याचेकडे वाहन चालवण्याचा परवाना मिळून आला नाही. त्याचप्रमाणे वाहनात असलेल्या सामानाची पावतीही त्याच्याकडे नव्हती. पोलिसांना त्याचा संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता टेम्पोमध्ये गोवा दारूचे 20 बॉक्स दिसून आले. बाजारभावानुसार या दारूची किंमत सुमारे 1 लाख 72 हजार 800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button