नारायण राणे : 'आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं होतं?' | पुढारी

नारायण राणे : 'आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं होतं?'

रत्नागिरी; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आधी अटक आणि नंतर सुटका झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाव घेता एक खळबळजनक आरोप केला आहे. ‘आम्हालाही जुन्या गोष्टी माहित आहेत. आपल्याच बंधुच्या पत्नीवर म्हणजेच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं?’, असा आरोप राणे यांनी रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केला आहे.

तुम्ही जुन्या गोष्टी उकरून काढल्या तर आम्हीही जुनी प्रकरणं टप्प्याटप्प्यानं बाहेर काढू. दादागिरी करु नका, वाट्याला जाऊ नका, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला आहे.

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा आज शुक्रवारी (दि.२७) रत्नागिरी येथून सुरु झाली. राणेंच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी दौरा ४ वाजता आटोपून राणे सिंधुदुर्गात जाणार आहे.

रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रेदरम्यान संबोधित करताना राणेंनी कुणाचेही नाव घेता अनेक गंभीर आरोप केले. सुशांतची केस अजून संपलेली नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला, असा सवाल त्यांनी केला. दरोडेखोरांना अटक करावी तशी मला अटक केली, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना हिरकमहोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सव असा उल्लेख केला. त्याचा संदर्भ देत नारायण राणे यांनी ‘कानाखाली आवाज काढला असता’ असे म्हणत वाद निर्माण केला.

नारायण राणेंविरुद्ध महाड (रायगड) सह नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. दरम्यान, स्थगित करण्यात आलेली जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झाली.

या दरम्यान राणेंनी पुन्हा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. यामुळे पुन्हा वाद उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button