राणेंची जनआशीर्वाद यात्रा कोकणात सुरु, रत्नागिरीत कडक बंदोबस्त | पुढारी

राणेंची जनआशीर्वाद यात्रा कोकणात सुरु, रत्नागिरीत कडक बंदोबस्त

रत्नागिरी/कणकवली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा आज शुक्रवारी (दि.२७) रत्नागिरीतून सुरु झाली. राणेंच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी दौरा ४ वाजता आटोपून राणे सिंधुदुर्गात जाणार आहे.

नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता खारेपाटण येथे आगमन होणार आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने नारायण राणे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ही यात्रा तळेरे, वैभववाडी, फोंडाघाट मार्गे रात्री कणकवलीत दाखल होणार आहे.

या यात्रेची कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागताचे भव्य बॅनर लावले आहेत, कमानी उभारल्या आहेत. २८, २९ दोन दिवस ही यात्रा सिंधुदुर्गात असणार असून, रविवारी सायंकाळी या यात्रेचा समारोप सावंतवाडी येथे होणार आहे.

नारायण राणे यांचे शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून रत्नागिरी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर रत्नागिरीतून त्यांची यात्रा सुरु झाली. रत्नागिरीतून लांजा, राजापूर अशी त्यांची यात्रा आहे.

केंद्रीयमंत्री झाल्यानंतर नारायण राणे हे प्रथमच सिंधुदुर्गात येत असल्याने त्यांच्या यात्रेची सिंधुर्दुग जिल्हावासीयांना उत्सुकता आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केल्याने नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाला होता.

या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणाही अलर्ट आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त जिल्ह्यात ठेवण्यात आला आहे. मोठी पोलिस कुमक दाखल झाली आहे. खारेपाटणमार्गे तळेरे, वैभववाडी, फोंडाघाट असा दौरा करत ना. राणे रात्री कणकवलीत दाखल होतील.

दरम्यान, राणे यांच्या अटकेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणे यांना फोन करून सर्व प्रकरणाची माहिती घेतल्याने भाजपचे केंद्रीय नेतृत्व आता यात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button