सिंधुदुर्ग : पहिलीत दाखल मुलांच्या संख्येत 1614 मुलांची घट; जि. प. शाळांमधील प्रवेशाची स्थिती | पुढारी

सिंधुदुर्ग : पहिलीत दाखल मुलांच्या संख्येत 1614 मुलांची घट; जि. प. शाळांमधील प्रवेशाची स्थिती

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीची पटसंख्या लक्षणीय कमी झाल्याचे चित्र आहे. सन 2021-22 या वर्षात पहिलीत 7 हजार 114 मुले दाखल झाली होती. मात्र 2022-23 या वर्षात 5 हजार 500 मुले दाखल झाली आहेत.

गेल्यावर्षी कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेली मुले घरीच राहिली. यावर्षी या मुलांना दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात कोरोना विषाणू संसर्गामुळे व्यवसाय ठप्प झाले. बहुतांश नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली. अशा परिस्थितीत पालकांना इंग्रजी शाळांची फी भरणे न परवडणारे झाले, त्यामुळे पालकांकडून आपल्या पाल्यांसाठी मराठी शाळांना पसंती देण्यात आली होती. मात्र, यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत पहिलीत प्रवेश करणार्‍या मुलांची संख्या कमी आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 1 हजार 387 शाळा असून पहिली ते आठवीच्या वर्गात 17 हजार 535 मुलगे व 17 हजार 583 मुली मिळून एकूण 35 हजार 118 मुले शिक्षण घेत आहेत. 2021-22 या वर्षात पहिलीत 3 हजार 569 मुलगे व 3 हजार 545 मुली मिळून एकूण 7 हजार 114 मुले दाखल झाली होती. तर 2022-23 या वर्षात 2 हजार 780 मुलगे व 2 हजार 720 मुली मिळून एकूण 5 हजार 500 मुले दाखल झाली आहेत.

Back to top button