रत्नागिरी : चिपळुणात जि. प. सदस्यासाठी रंगणार ‘हाय व्होल्टेज’ लढती | पुढारी

रत्नागिरी : चिपळुणात जि. प. सदस्यासाठी रंगणार ‘हाय व्होल्टेज’ लढती

चिपळूण; समीर जाधव : चिपळुणात जिल्हा परिषदेच्या दहा आणि पंचायत समितीच्या वीस जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यावेळी चिपळूण तालुक्यातून अवघी एक महिला जि. प. वर निवडून जाणार आहे. तर उर्वरित सर्व म्हणजे नऊ जागा सर्वसाधारण उमेदवारासाठी जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे चिपळूणमध्ये जि. प. निवडणुकीत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने जि. प. सदस्य होण्यासाठी कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

चिपळूणमध्ये एक जि. प. सदस्य वाढला आहे. याआधी नऊ संख्या होती, ती आता दहा झाली आहे तर पं. स.चे अठराऐवजी वीस गण झाले आहेत. जाहीर झालेल्या आरक्षणाचा मागोवा घेतल्यास यावेळची निवडणूक अटीतटीची होणार आहे. जि. प. साठी सर्वसाधारण उमेदवार रिंगणात येणार असल्याने उमेदवारांची संख्या वाढणार आहे. शिरळ गटामध्ये म्हणजेच खाडीपट्ट्यात मोठा संघर्ष दिसणार आहे. या ठिकाणी आ. भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांचे नाव चर्चिले जात आहे. मध्यंतरी त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर करून धुमधडाक्यात भूमिपूजने केली होती. त्यामुळे शिरळ गटामध्ये विक्रांत जाधव यांचे नाव चर्चेत आहे. याबरोबरच राजेश वाजे, फय्याज शिरळकर, रामदास राणे, पांडुरंग माळी, सुरेश गोलमडे आदींची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. पेढे गटात यावेळी मोठी चुरस होणार आहे.

पेढे गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी सर्वसाधारण उमेदवार असल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते अभय सहस्त्रबुद्धे यांचे नाव चर्चेत असून गतवेळी संधी हुकलेले दिलीप चव्हाण यांनी जोरदार तयारी केली आहे. याशिवाय राकेश शिंदे, प्रताप शिंदे तसेच बळीराम शिंदे यांची नावेदेखील चर्चेत आहे. यावेळी तालुक्यातील एकमेव असा अलोरे जि. प. गट सर्वसाधारण स्त्री उमेदवारासाठी आरक्षित झाला आहे. तालुक्यात जि. प.मध्ये एकमेव महिला अलोरे गटातून निवडून येणार आहे. त्यामुळे या गटाकडे तालुक्याचे लक्ष लागणार आहे. या ठिकाणी माजी सभापती धनश्री शिंदे, आ. सदानंद चव्हाण यांच्या पत्नी सीमा चव्हाण, माजी जि. प. सदस्य विनोद झगडे यांच्या पत्नी, या बरोबरच राष्ट्रवादीकडून देखील काही नावे पुढे येत आहेत. त्यामुळे अलोरे गटामध्ये महिलांमध्ये सामना रंगणार आहे. शिरगावमधून माजी पं. स. सदस्य बाबू साळवी, काँग्रेसचे भरत लब्धे, शिवसेनेचे चंद्रकांत सुवार, सुधीर शिंदे, वसंत ताम्हणकर, राष्ट्रवादीकडून मयूर खेतले आदी स्पर्धेत आहेत. सावर्डेमध्ये देखील मोठी चुरस रंगणार असून खेर्डी व सावर्डेत हाय व्होल्टेज ड्राम रंगले. सावर्डेतून माजी जि. प. सदस्य बाळकृष्ण जाधव, श्री. बागवे, युवराज राजेशिर्के, डॉ. राकेश चाळके आदी इच्छुक आहेत. या पुढच्या काळात या ठिकाणी उमेदवारांची संख्या वाढणार आहे.

खेर्डीमध्ये तालुक्यात सर्वात प्रतिष्ठेची लढत होईल. यावेळी खुल्या गटासाठी या जागा असल्याने खेर्डीत चुरस रंगेल. या जागेसाठी राष्ट्रवादीचे जयंद्रथ खताते, काँग्रेसचे प्रशांत, राष्ट्रवादीकडून नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर, सेनेकडून माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या पत्नी सीमा चव्हाण, युवा सेनेचे उमेश खताते, माजी सभापती स्नेहा मेस्त्री, माजी जि. प. सदस्या दिशा दाभोळकर, भाजपकडून जगदीश वाघुळदे आदी नावे चर्चेत आहेत. उमरोली गटातून भाजपकडून नीलम गोंधळी, माजी सभापती सेनेकडून पप्या चव्हाण, संदीप चव्हाण, राष्ट्रवादीकडून योगेश शिर्के, नंदकुमार शिर्के, मुबीन महालदार ही नावे चर्चेत
आहेत.

वहाळ व निवळी गटातून राष्ट्रवादीचे माजी सभापती सुरेश खापले, सेनेचे माजी उपसभापती लक्ष्मण शिगवण, सेना तालुकाप्रमुख संदीप सावंत चर्चेत आहेत. कोकरे गटातून सेनेचे माजी सभापती संतोष चव्हाण, राष्ट्रवादीकडून संजय कदम, महेंद्र सुर्वे आदी नावे चर्चेत आहेत. या पुढच्या काळात जि. प. गटासाठी उमेदवारांची संख्या वाढणार असून इच्छुकांमध्ये रस्सीखेच होणार आहे. एखाद्याला उमेदवारी न मिळाल्यास चिपळूणच्या जि. प. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गटबाजी आणि बंडाळी होण्याची शक्यता आहे. यामुळे चिपळूण तालुक्यातील जि. प. सदस्यपदासाठी काँटे की टक्कर आहे. दहापैकी नऊ जागा खुल्या असल्याने मोठी स्पर्धा रंगणार आहे. याउलट पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र उमेदवार शोधण्याची वेळ राजकीय पक्षांवर येणार आहे. जि. प.मध्ये अवघी एक महिला तर पं. स.मध्ये दहा महिला निवडण्यात येणार आहेत. वीस सदस्यांच्या चिपळूण पं. स.मध्ये पेढे गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने येथे उमेदवार शोधावा लागणार आहे. या ठिकाणी कळंबस्तेेचे सरपंच विकास गमरे यांचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर आहे तर सेनेमधूनही अनेकजण इच्छुक आहेत.

अलिकडच्या काळात पं. स. सदस्यांना विकास निधी फार मिळत नसल्याने पं. स. सदस्य होण्यामध्ये अनेकांना रस नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना उमेदवार उभा करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांची शोधाशोध करून संबंधितांची कागदपत्रे गोळा करणे व त्याची पूर्तता करावी लागणार आहे. मात्र, पं. स.मध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादी तुल्यबळ असून येथेही सामना रंगतदार होणार आहे. काँग्रेस व भाजप यांचे तालुक्यात एकही सदस्य नाहीत. मात्र, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आणि काँग्रेस किती उमेदवार लढविते हे महत्त्वपूर्ण ठरणार असून निवडणुकीत या उमेदवारांमुळे रंगत अधिकच वाढणार आहे.

Back to top button