कुडाळ : राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न | पुढारी

कुडाळ : राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न

कुडाळ; पुढारी वुत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ शिवसेना शाखा येथे युवासेनेने आंदोलन केले. यावेळी युवासेनेने राणेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कुडाळ येथे आंदोलकांकडून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडत आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनवर नेले.

मुबंईहून निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. याविरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ राणेंना अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्ताचे आदेश निघाले.

दुसरीकडे शिवसैनिक आक्रमक झाल्याने त्यानां प्रत्युत्तर म्हणून भाजपही मैदानात उतरली. कुडाळमध्ये शिवसेना शाखेसमोर युवा शिवसेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली नागेंद्र परब, अमरसेन सावंत, योगेश धुरी, बबन बोभाटे आदींसह २० ते २५ शिवसैनिकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

यावेळी आंदोलकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर परिस्थितीचे गांभिर्य ओळखून कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनवर आणले व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडून दिले. यावेळी कुडाळ शहरात रिझर्व्ह पोलीस पथकासह अधिक पोलिसांची कुमक तैनात ठेवली आहे.

भाजपकडूनही घोषणाबाजी…

शिवसेनेच्या आंदोलनानंतर कुडाळ भाजप कार्यालयाकडे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राणेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. एकूणच कायदा सुव्यवस्था बिघड नये यासाठी कुडाळ पोलिसांनी शिवसेना व भाजप या दोन्ही कार्यालयाबाहेर आपली फौज तैनात ठेवली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

Back to top button