चिपळुणात पावसाचा जोर ओसरला | पुढारी

चिपळुणात पावसाचा जोर ओसरला

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : गेले आठ दिवस कोसळणार्‍या पावसाने उसंत घेतली आहे. चिपळूण परिसरात पावसाचा जोर कमी झाला असून, वाशिष्ठी आणि शिव नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खूपच खाली गेली आहे. शहरातून वाहणार्‍या वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेख पूल येथे 4.60 मी., शिव नदीतील पाणी पातळी 2.90 तर बाजार पुलावर 3.02 मी. इतकी पाणी पातळी होती. यामुळे सद्यस्थितीत व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षीच्या पावसाच्या हंगामात चिपळूण शहरात एकदाही वाशिष्ठी किंवा शिव नदीचे पाणी शिरलेले नाही. काही सखल भागात सुरुवातीच्या काळात पाणी आले होते, तर दि. 13 जुलै रोजी वाशिष्ठीने आपले पात्र सोडून नव्या बाजार पुलालादेखील पाणी लागले होते. मात्र, पाऊस कमी झाल्याने धोका टळला आहे.

गेल्यावर्षी 22 व 23 जुलैला महापूर आला होता. मात्र, यावर्षी कमी कालावधीत जास्त पाऊस झालेला नाही. परिणामी, चिपळूणवासीयांना दिलासा मिळाला आहे. त्यात वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ काढल्यामुळे दोन्ही नद्यांनी आपली मर्यादा सोडलेली नाही. कोयना अवजल आणि पावसाचे पाणी वाशिष्ठी नदीतून थेट वाहत जाऊन समुद्राला मिळाले आहे. दोन्ही नद्या दुथडी भरून वाहूनदेखील नदीलगतच्या भागात पाणी शिरले नाही. त्यामुळे लोकांकडून तूर्त समाधान व्यक्‍त होत आहे. यावर्षी पावसाने गतवर्षीची सरासरी गाठली असतानाही बाजारपेठेत पाण्याचा शिरकाव झालेला नाही.

Back to top button