रत्नागिरी : मिनी मंत्रालयासाठीचा इच्छुकांचा ‘हिरमोड’ | पुढारी

रत्नागिरी : मिनी मंत्रालयासाठीचा इच्छुकांचा ‘हिरमोड’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या 62 गट व पंचायत समितीच्या 124 गणांच्या आरक्षणाची सोडत बुधवार दि.13 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तालुकास्तरावरील तहसील कार्यालयात होणार होती. मात्र मंगळवारी सायंकाळी अचानक स्थगित करण्यात आली आहे. पावसाचे कारण देत हा कार्यक्रम स्थगित करण्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आरक्षण सोडतीमध्ये कुणाचा पत्ता कट होणार, तर कुणाला लॉटरी लागणार याकडे लक्ष लागून राहिले होते. इच्छुकांनी मात्र आपल्या सोयीचे आरक्षण पडावे यासाठी देव पाण्यात घातले होते. त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

जिल्हा परिषदेमध्ये पूर्वी 55 गट व पंचायत समित्यांचे 110 गण होते. परंतू नव्या रचनेनुसार जिल्ह्यात 7 जिल्हा परिषद गटांची वाढ होवून त्यांची संख्या 62 वर पोहोचली आहे. 9 पंचायत समित्यांच्या गणांमध्ये 14 ची वाढ होवून ती 124 वर पोहोचली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार नवीन रचनेनुसार प्रक्रिया होणार होती. ओबीसी आरक्षण सोडून ही सोडत काढण्यात येणार होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या गटांपैकी 31 जागा महिलांसाठी आरक्षीत होणार आहेत. पंचायत समिती गणात सर्वसाधारण 124 जागांपैकी 62 जागा महिलांसाठी आरक्षीत होणार आहेत.

बुधवारी होणार्‍या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. गट व गणामध्ये आपल्याला अनुकूल असे आरक्षण पडावे यासाठी बहुतांश जणांनी देव पाण्यात घातले आहेत. तसेच या आरक्षण सोडतीत कुणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला लॉटरी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. मात्र मंगळवारी अचानक या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील 12 जुलै रोजीच्या पत्रान्वये ही आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली. या सर्व पार्श्वभूमीवर इच्छूकांचा हिरमोड झाला
आहे.

Back to top button