रत्नागिरी : शेतीच्या बांधावर भरली शाळा | पुढारी

रत्नागिरी : शेतीच्या बांधावर भरली शाळा

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट शीळ या गावामध्ये आयोजित करण्यात आली होती. पावसाळ्यातील शेतीपूरक विविध कामांचा विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे परिचय करून देण्यात आला.

लावणी, नांगरणी, बांध-बंधिस्ती, शेतकरी दैनंदिन जीवन परिचय, गोपालन, शीळ धरणाचा परिचय व त्याचे उपयोग, गाव मंदिराचा परिचय व त्या मागच्या लोकांच्या भावना, गावातील विपुल निसर्ग संपदेचा परिचय अशा विविध उद्देशाने विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. इयत्ता नववीतील 48 विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीमध्ये सहभाग घेतला. शेती कामाचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी विद्या नसून, प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग होतो. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.

अशोक विचारे, विनायक सावंत या शेतकरी मित्रांनी या कामी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पावसाळ्यामध्ये गावामध्ये नैसर्गिक पद्धतीने वाढणार्‍या रानभाज्या व विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, झाडे-फुले-पाने निसर्गात विहार करणारे पक्षी- फुलपाखरे यांच्याकडून विद्यार्थ्यांनी खूप नकळत शिकण्यासारखे असते आणि या क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यांना हा अनुभव आला. शाळेच्या मुख्याध्यापिका गुळवणी, उपमुख्याध्यापक व इतर सर्व सहकारी शिक्षक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. राजेश आयरे व बापट यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटीसाठी नियोजन केले. विद्यार्थी व पालकांचे सहकार्य यामुळे ही क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पूर्ण करता आली.

Back to top button