रायगड : रोहा तालुक्यात तुफानी पावसामुळे पूरसदृश्य स्थिती | पुढारी

रायगड : रोहा तालुक्यात तुफानी पावसामुळे पूरसदृश्य स्थिती

धाटाव; पुढारी वृत्तसेवा : धाटावसह रोहा तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, गेले ४ दिवसांपासून पावसाने रोहा तालुक्यात जोरदार झोडपले आहे. त्यामुळे वरसे, रोठ खुर्द, उडदवणे, धाटावसह सर्वच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, या भागात नुकतीच केलेली भात लावणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त होत आहे.

सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला तसेच रोठ खुर्दची उपनदी गंगेला पूर आला असून या परिसरातील संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे. अतिवृष्टीमुळे धाटाव स्टॉप येथील दुकानातून तसेच धाटाव येथील ग्रामस्थांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झालेले आहे. वरसे येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. या भागातील सर्वात उंच उडदवणे येथील पुलाला लागून पाणी वाहत असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. असाच पाऊस अजून पडत राहिला तर या भागातील काही गावांचा संपर्क तुटण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

दि. ४ जुलै २०२२ पासून परिसरात दमदार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे धाटाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. गेल्या चार दिवसात धाटाव परिसरात ५९९ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धाटाव, विष्णूनगर, किल्ला, वाशी, महादेववाडी, मळखंडवाडी, लांढर,  उडदवणे, तळाघर, बोरघर, रोठ बुद्रुक, रोठ खूर्द, वरसे, निवी या भागातील खलाटी पाण्याखाली गेली आहेत.

Back to top button