रत्नागिरी : चिपळुणातील वाशिष्ठी, शिवनदी इशारा पातळीजवळ | पुढारी

रत्नागिरी : चिपळुणातील वाशिष्ठी, शिवनदी इशारा पातळीजवळ

चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार चिपळुणात सातत्याने पाऊस सुरू आहे. मात्र, दिवसभर पाऊस थांबून-थांबून पडत असल्याने शिव आणि वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या बाहेर गेल्यानंतरही पाऊस अधेमधे विश्रांती घेत असल्याने अद्याप हानी पोहोचलेली नाही. दरम्यान, परशुराम घाट बंद असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

हवामान खात्याने 9 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे व या मार्गावरील हलकी वाहने आंबडस-चिरणी मार्गे वळविण्यात आली आहेत. लोटे एमआयडीसीतील वाहनांसाठी जाताना चिरणीमार्गे तर येताना आवाशी मार्गे रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे. त्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीमधील तीन शिफ्टवर परिणाम झाला आहे.

चिपळुणात दि. 5 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 169 मि.मी. तर दि. 6 रोजी सकाळी8 वाजेपर्यंत 165 मि.मी. म्हणजेच 48 तासांत तब्बल 334 मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र, पावसाने काहीवेळ विश्रांती घेतल्याने नदीकिनार्‍याला त्याचा फारसा फटका बसलेला नाही. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास वाशिष्ठी व शिव नदीतील पाणी पातळी इशारा पातळीच्या वर जाऊन नदीकिनारी भागाला धोका पोहोचू शकतो.

बुधवारी सकाळी 10 वा. वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी 5.80 मीटरपर्यंत होती. इशारा पातळीच्या वर ही पाणी पातळी होती. याचवेळी बाजार पुलाच्या पाण्याची पातळी 3.90 मीटर होती. याचवेळी शिव नदीच्या पाण्याची पातळीदेखील वाढली होती.
मात्र, सुदैवाने पावसाचा जोर सकाळच्या वेळेत कमी झाल्याने शहरात पाणी शिरू शकले नाही. सायंकाळी पाऊस कायम असून वाशिष्ठी, शिव नदीतील पाणी पातळी कमी-जास्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. नदीलगतच्या भागातील लोकांनीही सावध राहाण्याचा इशारा देण्यात येत आहे.

Back to top button