सिंधुदुर्ग : सलग दुसऱ्या दिवशी आंबेरी पूल पाण्याखाली | पुढारी

सिंधुदुर्ग : सलग दुसऱ्या दिवशी आंबेरी पूल पाण्याखाली

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यात सलग दोन दिवस सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे कर्ली नदीला पूर आला आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदी किनारची भात शेती सुध्दा पुर्णतः पाण्याखाली गेली. बहुतांशी छोटे कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे माणगाव खोर्‍यातील आंबेरी पुल सलग दुसर्‍या दिवशीही चार तास पाण्याखाली राहिला. त्यामुळे माणगाव खोर्‍यांतील २७ गावांमधील संपर्क तुटला. तसेच वाहनचालक व शाळकरी मुलांचे हाल झाले. दुपारनंतर संपुर्ण तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याने नदी, नाल्यांच्या पाण्याची पातळी उतरली. त्यानंतर वाहतुकीची ये-जा सुरू झाली.

गेले दोन दिवस कुडाळ तालुक्यात पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. सह्याद्री पट्ट्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे कर्ली नदी पूर्ण क्षमतेने दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी कर्ली नदीवर असलेले माणगाव खोर्‍यातील बहुतांशी सर्व कॉजवे तसेच आंबेरी येथील मुख्य पुल सलग दुसर्‍या दिवशी पाण्याखाली गेले. तब्बल चार तास पुल पाण्याखाली असल्यामुळे माणगांव खोर्‍यातील २७ गावांचा संपर्क तुटला. आंबेरी पुलावरील पाण्यावर पुलाच्या पलिकडे एसटीने मार्गस्थ होणार्‍या शाळकरी मुलांचे मोठे हाल झाले. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने नदीचे पाणी ओसरल्यानंतर आंबेरी पुलावर वाहने पूर्ववत सुरू झाली. माणगाव खोर्‍यातील दुकानवाड, हळदीचे नेरूर ( फुटब्रिज) व उपवडे कॉजवे पूर्णतः पाण्याखाली राहिले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button