सिंधुदुर्ग : नापणे शेर्पे धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी (व्हिडिओ) | पुढारी

सिंधुदुर्ग : नापणे शेर्पे धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी (व्हिडिओ)

वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : वैभववाडी तालुक्यातील बारमाही वाहणारा धबधबा म्हणून प्रसिद्ध असलेला नापणे शेर्पे धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. हे नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी दोन वर्षे कोरोनामुळे पाठ फिरवलेल्या पर्यटकांची पून्हा गर्दी दिसू लागली आहे. कोल्हापूर तळेरे राष्ट्रीय महामार्गावर नाधवडे येथून सुमारे ६ कि.मी. तर वैभववाडी रेल्वेस्टेशनवरुन ३ कि. मी. अंतरावर नापणे धबधबा आहे. रमाही वाहाणारा हा धबधबा पर्यटकांसाठी खास आकर्षक आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतांना वैभववाडी तालुका हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आलेला पर्यटक हा नापणे धबधब्याचा आनंद घेतल्याशिवाय पुढच्या पर्यटनाला जात नाही.

दोन्ही बाजूने हिरवीगर्द झाडी, उंचावरुन खोल डोहात पडणारे धबब्ब्याचे फेसाळणारे पांढरे शुभ्र पाणी, त्याचे हवेवर उडणारे पाण्याचे गार गार तुषार, परिसरातील पक्षांची किलबील असे विलोभनीय नैसर्गिक दृश्य मनाला भुरळ पाडते. उन्ह्यात नदीत उतरुन पर्यटक सहकुटुंब धबधब्याचा आनंद घेतात. मात्र, पावसाळ्यात नदीतील पाण्याचा प्रवाह मोठा असतो. त्यामुळे धबधबा रौद्ररुप धारण करतो. त्यामुळे पर्यटकांना लांबूनच धबधबा पाहण्याचा आनंद घ्यावा लागतो.

नापणे धबधबा हा बारमाही वाहाणारा धबधबा असूनही धबधबा पर्यटकदृष्ट्या विकसित करण्यास पर्यटन विभागाची उदासिनता दिसून येते. तत्कालीन पालकमंञी दिपक केसरकर व तत्कालीन पर्यंटनमंत्री जयप्रकाश रावल यांनी या धबधब्याला भेट देऊन धबधबा पर्यटनदृष्ट्या विकसित करणे व येणाऱ्या पर्यटकांना सेवा सुविधा पुरविण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सुलभ शौचालय, कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रुम या सुविधा होणे आवश्यक आहे. तसेच धबधब्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटनदृष्ट्या विकसित करणे आवश्यक आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button