सिंधुदु्र्ग : अल्पवयीन युवतीवर अत्याचार; परप्रांतीय युवकावर पोक्सोंतर्गत गुन्हा | पुढारी

सिंधुदु्र्ग : अल्पवयीन युवतीवर अत्याचार; परप्रांतीय युवकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : परजिल्ह्यातून सिंधुदुर्गात मोलमजुरीसाठी आलेल्या एका 24 वर्षीय युवकाने एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीशी झालेल्या ओळखीचा फायदा घेत तिला कुडाळ येथील लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 2021 मध्ये घडली. गेल्या सात-आठ महिन्यांपासून त्या युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केल्याने त्याने त्या युवतीचा आक्षेपार्ह फोटो युवतीच्या कुटुंबातील काहीजणांना मोबाईलवरून व्हायरल केला. याप्रकरणी त्या युवतीच्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी त्या परप्रांतीय युवकावर पोक्सो आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

2020 पासून त्या परप्रांतीय युवकाची कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एका युवतीशी ओळख झाली होती. तो त्याच परिसरात मोलमजुरी करत असे. तिच्या घरी त्याचे येणे-जाणेही होते. या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने गतवर्षी त्या युवतीला कुडाळ येथे नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर ती युवती मुंबईला गेली. तिचे आई-वडीलही मुंबईला असतात. गेल्या सात-आठ महिन्यांपासून त्या युवतीने त्याच्याशी संबंध तोडले होते. मात्र, तिने आपल्याशी संबंध ठेवावेत या मागणीसाठी त्याने तगादा लावला होता. अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्याने तिचे आक्षेपार्ह स्थितीतील मोबाईलवरील फोटो तिच्या कुटुंबीयांना व्हायरल केले. त्यामुळे हा सारा प्रकार उघड झाला. अखेर त्या युवतीने कणकवली पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्या परप्रांतीय युवकावर गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यासाठी कणकवली पोलिसांचे पथक रवाना होणार असल्याचे कणकवलीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी सांगितले.

Back to top button