रत्नागिरी : एस.टी.च्या कार्गोमधून अवैध लाकडाची वाहतूक : वनविभागाची साखरपा येथे कारवाई | पुढारी

रत्नागिरी : एस.टी.च्या कार्गोमधून अवैध लाकडाची वाहतूक : वनविभागाची साखरपा येथे कारवाई

साडवली : पुढारी वृत्तसेवा : एस.टी.च्या कार्गो माल वाहतूक गाडीतून जंगली चिरीव लाकडाची विनापासिंग वाहतूक करताना देवरूख वनविभागाने कारवाई केली. ही कारवाई शनिवारी रात्री संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी (साखरपा) तपासणी नाक्यावर करण्यात आली.

याबाबत देवरूख वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुर्शी येथे वन उपजत तपासणी नाक्यावर असणारे वनरक्षक सुरज तेली यांनी संबंधित गाडी तपासणी नाक्यावर आली असता तपासणीसाठी थांबवली. यानंतर त्यांनी याची माहिती वरिष्ठ व सहकाऱ्यांना दिली. यावेळी गाडीची तपासणी केली असता जंगली चिरीव लाकूड आढळून आले. चालकाकडे त्यांनी विचारणा केली असता इराण्णा सतीश इंडे (मुळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर, सध्या रा. रत्नागिरी) असे नाव सांगून विनापासिंगची तुळसणी ते कोल्हापूर अशी लाकडाची वाहतूक करत असल्याचे कबूल केले.

ही कारवाई देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक सुरज तेली, वनरक्षक संजय रणधीर व वनरक्षक न्हानू गावडे यांनी केली. याप्रकरणी गाडी व चालकाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. चालक इराण्णा इंडे याच्याविरोधात वनविभागाकडून भारतीय वनअधिनियम १९२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गाडीतील सुमारे ४०० घनफूट लाकूड वनविभागाने जप्त केले आहे.अशाप्रकारे एस. टी. कार्गो माल वाहतूक गाडीमधून विनापासिंगची लाकडाची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाल्याने संगमेश्वर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button