कोकण : कुडासे खुर्द ग्रा. पं. ला ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार’! | पुढारी

कोकण : कुडासे खुर्द ग्रा. पं. ला ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार’!

दोडामार्ग,  पुढारी वृत्तसेवा : कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन) या ग्रामपंचायतीला ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दोडामार्ग गटविकास अधिकारी मनोजकुमार बेहरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुडासे खुर्द ग्रा.पं. सदस्य संदेश देसाई, ग्रामसेवक ज्योती डोंगरदिवे व अन्य सदस्य, ग्रामस्थ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

जि. प. माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तालुका आत्मा समिती अध्यक्ष प्रेमानंद देसाई, सहायक कृषी अधिकारी नीलेश जाधव, कोलझर सरपंच ऊर्मिला देसाई आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उपक्रमशील शेतकर्‍यांचा गौरव करण्यात आला. प्रगतशील शेतकरी अनिल मोरजकर, चंद्रशेखर सावंत यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी मनोजकुमार बेहरे यांनी शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगती साधावी, यासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी आपणास पूर्णपणे सहकार्य करणार आहेत. दोडामार्ग तालुक्यातील शेतकर्‍यांनी केळी लागवडीसाठी प्रस्ताव तयार करावेत, असे आवाहन केले. प्रेमानंद देसाई, एकनाथ नाडकर्णी यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

पुरस्कार ही अभिमानास्पद बाब
कुडासे खुर्द ग्रामपंचायत स्थापनेपासून आतापर्यंत सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे करताना व शासनाचे विविध उपक्रम राबविताना महिला, ज्येष्ठ ग्रामस्थ, युवा पिढी यांनी परिश्रम घेतले. त्याबरोबरच सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी यांनी काम करताना मोठे पाठबळ दिले. त्यामुळे विविध पुरस्कार प्राप्त झाले. तालुक्यात प्रथम ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार’ मिळाला ही खरोखरच अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच संगीता देसाई यांनी दिली.

Back to top button