कोकण : आम्ही आदित्य ठाकरेंसोबत कायम | पुढारी

कोकण : आम्ही आदित्य ठाकरेंसोबत कायम

कुडाळ, पुढारी वृत्‍तसेवा : वरिष्ठ पातळीवर कोणत्याही घडामोडी घडल्या तरी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्धार कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय युवासेनेच्या बैठकीत उपस्थित पदाधिकार्‍यांनी केला.

भविष्यात शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा विचार, वसा जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात नेण्याचा तसेच आगामी सर्व निवडणुकांमध्ये संघटनेचा भगवा झेंडा डौलाने फडकवण्याचा निर्धार सर्व पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केला. व्यापक संपर्क अभियान राबविण्याचा तसेच तालुकानिहाय युवासैनिकांचे मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवसेनेत निर्माण झालेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेची महत्त्वाची बैठक युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट
यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ एमआयडीसी शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी घेण्यात आली.  जिल्हाभरातून 35 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सर्व पदाधिकार्‍यांनी एकमताने आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये ठामपणे उभे असल्याचे सांगितले.

युवासेनेच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या माध्यमातून अजून जोमाने पुढे नेऊन युवासेना तळागाळात पोहोचवण्याचा निर्धार सर्व पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केला. राज्य पातळीवर घडामोडी घडत असल्या तरी जिल्ह्यातील युवासेनेचा कोणताही पदाधिकारी वेगळा विचार करीत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

युवासेना पदाधिकारी सागर नाणोसकर, योगेश धुरी, योगेश नाईक, पंकज शिरसाट, संदीप महाडेश्‍वर, मितेश वालावलकर, दीपेश कदम,मायकल डिसोझा, नामदेव राणे, श्रीकांत राऊळ, दादा सारंग, वेदांत पेडणेकर, मंजुनाथ फडके, उत्‍तम नार्वेकर, विक्रांत नेवगी आदी उपस्थित होते.

Back to top button