कोकण : कवठी-परुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक | पुढारी

कोकण : कवठी-परुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक

वालावल ,  पुढारी वृत्तसेवा :  कुडाळ तालुक्यातील नेरूर, वालावल, कवठी, परुळे रस्ता धोकादायक बनला आहे. काही ठिकाणी रस्त्यालगतचा भाग खचुन रस्त्याच्या दिशेने आला असुन काही झाडे रस्त्यावरच कलंडली आहेत. त्यामुळे या मार्गावर कधीही धोका उद्भवु शकतो. याबाबत ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कवठी-चिपी-परुळे या रस्त्यावर कुडाळ तालुक्याच्या हद्दीत कवठी गावकरवाडी येथून या वर्षी रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे
काम बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. यावेळी ठेकेदाराने रस्त्याच्या बाजूने गटार काढण्यासाठी डोंगराच्या बाजूकडील भागात खोदकाम केले, परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीही उपाय योजना काम करताना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आता पावसाळा सुरू होताच या ठिकाणी दरड कोसळत आहे. त्यातच या ठिकाणावरुन वीज वाहिन्या जात असल्याने या डोंगरावरील झाडे ही पडून वीज वाहिन्यावर येत आहेत. या परिसरात वीज पुरवठा खंडित होत आहे.

पावसाळी मौसमात येथील डोंगराची माती रस्त्यावर येत असल्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे याची संबंधित विभागाने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी या भागातील वाहनचालक व ग्रामस्थांमधुन करण्यात येत आहे.

Back to top button