रत्नागिरी : शिवसेना नेते अनंत गीते ‘अ‍ॅक्शन मोड’वर | पुढारी

रत्नागिरी : शिवसेना नेते अनंत गीते ‘अ‍ॅक्शन मोड’वर

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेमधून बाहेर पडून बंडखोरी केलेल्या आमदारांना पुन्हा घेऊ नका. आता आपण रत्नागिरी आणि रायगडची जबाबदारी घेतो. रत्नागिरीची आपल्याला चिंताच नाही. रायगडही मजबूत करू, अशा अ‍ॅक्शन मोडमध्ये शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार अनंत गीते यांनी भूमिका घेतली आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुणबीबहुल समाज असल्याने गीते यांच्या भूमिकेला शिवसेनेमध्ये महत्त्व आले आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, रायगडमधील तीन, रत्नागिरीमधील दोन, सिंधुदुर्गतील एक आमदार शिंदे गटाला जावून मिळाले आहेत. यामुळे शिवसेनेच्या आमदारांची संख्या घटली असून, रत्नागिरी जिल्ह्यात आ. भास्कर जाधव आणि आ. राजन साळवी हे दोन आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत. या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. आ. उदय सामंत आणि आ. योगेश कदम शिंदे गटाला मिळाल्याने सामंत यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, दोन आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला तडा जाण्याचा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी खा. अनंत गीते यांनी लोटेत येऊन मेळावा घेतला.

गीते हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चारवेळा, रायगडमध्ये दोनवेळा खासदार म्हणून काम केले आहे. याच कालावधीत त्यांनी केंद्रामध्ये अवजड उद्योग खाते तसेच ऊर्जामंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे खा. सुनील तटकरे यांनी गीते यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर माजी खासदार गीते फारसे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात फिरकले नव्हते. पक्षीय राजकारणात त्यांचे दर्शन होत नव्हते. रायगड जिल्ह्यातील शिवसेना आमदारांची खदखद लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे व ना. आदिती तटकरे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. यावेळी जाहीर सभेत त्यांनी खा. तटकरे यांच्याविरोधात वक्‍तव्ये केली होती. महाविकास आघाडीत असताना देखील गीते यांच्या भूमिकेमुळे संघर्ष निर्माण झाला होता. हा वाद शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देखील गेला होता. त्यानंतरच्या काळात गीते शिवसेनेमध्ये फारसे सक्रिय नव्हते. काही कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी ते जिल्ह्यामध्ये आले होते. सामाजिक व्यासपीठावर त्यांचे दर्शन होत होते. मात्र, संघटनात्मक कार्यात फारसे सक्रिय नव्हते. मात्र, आता घडलेल्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर गीते संघटनेसाठी अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

बंडखोरीच्या भूतांना बाटलीबंद करणार. आता आपण रत्नागिरी व रायगड जिल्ह्याची जबाबदारी घेत आहेत. रत्नागिरीची चिंता नाहीच तर रायगडमधील संघटनाही मजबूत करू. दोन्ही जिल्ह्यात शिवसेना भक्‍कम आहे. ठिकठिकाणी जावून ती अधिक मजबूत करू, अशी भूमिका गीते यांनी घेतली आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेता दोन्ही जिल्ह्यात कुणबी समाजबांधवांची संख्या मोठी आहे आणि या समाजात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे संघटनात्मक बांधणीसाठी त्याचा उपयोग शिवसेनेला मोठा होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गीते सक्रिय होत आहेत. शिवसेना संकटात असताना शिवसेनेचे एक ज्येष्ठ व जुने नेते पुन्हा संघर्षाच्या तयारीत असल्याने कार्यकर्त्यांमध्येसुद्धा जोष निर्माण होणार आहे.

Back to top button