खा. राऊत डागणार आ. सामंतांविरोधात तोफ ; शिवसेनेचा रत्नागिरीत बैठकांचा सपाटा

रत्नागिरी : खासदार कार्यालयात उपस्थित असलेले शिवसेना पदाधिकारी.
रत्नागिरी : खासदार कार्यालयात उपस्थित असलेले शिवसेना पदाधिकारी.
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि रत्नागिरीचे आमदार गुवाहाटीत बंडखोरांमध्ये दाखल झाल्यानंतर रत्नागिरीत शिवसेना पदाधिकार्‍यांमध्ये शांतता आहे. वरिष्ठांच्या आदेशाने 'साईड'ला राहणार्‍या जुन्या शिवसैनिक व पदाधिकार्‍यांना हाताशी धरुन पुन्हा एकदा शिवसेनेची मोट बांधण्यासाठी पदाधिकारी सरसावले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघ मुख्यमंत्री ठाकरेंच्या पाठीशी उभा करण्यासाठी ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.

रत्नागिरी तालुका हा शिवसेनेचा अभेद्य गड राहिला असला तरी मागील अनेक वर्षात फंदफितुरीचे ग्रहण लागले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि रत्नागिरी विधानसभेचे आमदार उदय सामंत हे 2014 मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांनी नव्या-जुन्यांना एकत्र आणत गेली आठ वर्ष शिवसेनेचा बालेकिल्‍ला बनवले. पंचायत समिती, नगर पालिकेमध्ये एकहाती सत्ता आणली. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दक्षिण रत्नागिरीत शिवसेनेचे बंड पोहचणार नाही अशी शंका होती. बंडाच्या दोन दिवसानंतर अचानक ना. उदय सामंत हे गुवाहाटीत दाखल झाले आणि रत्नागिरीसह राज्याच्या राजकारणामध्येही हलकल्‍लोल माजला.

रत्नागिरीतील शिवसैनिकांना मोठा धक्‍का होता. मात्र असे काही होईल अशी शक्यता विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक व पदाधिकार्‍यांना आली होती. बंडाच्या दरम्यान, आ. सामंत हे आपल्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकार्‍यांशी संवाद साधला होता. त्या बैठकांमध्ये जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व धनुष्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगितले. या बैठकांचा आढावा घेऊनच आ. सामंत यांनी गुवाहाटीची वाट धरली होती. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरु असतानाच, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी येथील शिवसैनिक व पदाधिकार्‍यांना दिशा देण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारपासून रत्नागिरीत खा. विनायक राऊत यांच्या कार्यालयात बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. माजी जिल्हाप्रमुख व सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांच्या बैठका होत आहेत. उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुखांपासून युवा सेना, महिला संघटक यांच्याशी संपर्क साधला जात असून आम्ही शिवसेनेशी बांधिल असल्याची भूमिका अनेकांनी व्यक्‍त केली आहे.

आ. सामंतांच्या भूमिकेबाबत शिवसैनिकामधून नाराजी व्यक्‍त होत असली तरी त्याचे पडसाद उमटू नयेत याकडेही पदाधिकार्‍यांचे लक्ष आहे. सोमवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकार्‍यांनी खा. राऊत यांच्या कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी रत्नागिरीकर असल्याचे सांगत जोरदार घोषणा दिल्या. यावेळी राजेंद्र महाडीक यांनी सांगितले की, खूप दिवसांनी शिवसैनिक असे उत्स्फूर्तपणे एकत्र आल्याचे सांगत रत्नागिरीत कायम असल्याचे म्हणाले.

शिवसेना पदाधिकार्‍यांकडून भव्य मेळाव्याची तयारी

आ. उदय सामंत यांनीही एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था मिटवण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत हे गुरुवारी रत्नागिरीत सेना पदाधिकार्‍यांचा मेळावा घेणार आहेत. खा. राऊत हे आ. सामंतांविरोधात काय तोफ डागणार याकडे शिवसेना पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरीचे आ. उदय सामंत हे शिंदेगटाला जाऊन मिळाल्यानंतरही दोन दिवस रत्नागिरीतील पदाधिकारी शांत राहिल्याचे दिसून आले. त्यानंतर खा. राऊत व वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानंतर विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. आ. सामंत यांच्या निर्णयावर शिवसैनिक नाखुष असल्याचे दिसत आहेत. खा. राऊत यांच्याकार्यालयाकडून जुन्यानव्या पदाधिकार्‍यांशी संपर्क सुरु करण्यात आला आहे. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. आ. सामंत सेनेत दाखल झाल्यानंतर काहीसे बाजूला पडलेले शिवसेना पदाधिकारी यात विशेष पुढाकार घेताना दिसत आहेत. सामंतांच्या बंडखोर गटात जाण्याने नाराज असलेल्या शिवसैनिकांमधील असंतोषाला वाट मोकळी करुन देण्यासाठी स्वत: खासदार विनायक राऊत रत्नागिरीत येणार आहेत.

गुरुवारी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिकांशी खा. विनायक राऊत एका मेळाव्यात संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात ते आ. सामंत यांच्याविरोधात काय तोफ डागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी शिवसेना पदाधिकार्‍यांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news