मंत्रिपदासाठी गुवाहाटीला जाणे ही गद्दारी! : जयेंद्र परूळेकर | पुढारी

मंत्रिपदासाठी गुवाहाटीला जाणे ही गद्दारी! : जयेंद्र परूळेकर

सावंतवाडी ; पुढारी वृत्तसेवा : मंत्रिपद आणि पालकमंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी घाईघाईने गुवाहाटीला जाणे ही शिवसेना पक्षाशी गद्दारी आहे. सिंधुदुर्गातील जनता आणि सच्चा शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाही, असा टोला शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते आणि माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी आ. दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे,ही वेळ खरंतर स्वार्थ साधण्याची नाही. पक्षनेतृत्वा सोबत खंबीरपणे उभे राहण्याची आहे. हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दगाफटका करणार्‍या अवलादीला सच्चा शिवसैनिक कधीच माफ करणार नाही. मंत्रिपदाच्या लाचारीसाठी गुवाहाटीला पळणार्‍यांचा धिक्कार असो. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी सुरू असलेले ‘ऑपरेशन लोटस’ राज्यासाठी घातक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना फोडण्यासाठी आमदार पळवापळवी करून भाजपप्रणीत सत्ता असलेल्या गुजरात मधील सुरत आणि मग आसाम मधील गुवाहाटी येथे आमदारांची जी बडदास्त ठेवली जात आहे त्यामागे कोणत्या पक्षाची यंत्रणा कार्यरत आहे हे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे.अशा लाचारांना जनता माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया डॉ.परुळेकर यांनी दिली आहे.

Back to top button