सिंधुदुर्ग : कुडाळात नवरोबांनी वडाला फेऱ्या घालत साजरी केली वटपौर्णिमा | पुढारी

सिंधुदुर्ग : कुडाळात नवरोबांनी वडाला फेऱ्या घालत साजरी केली वटपौर्णिमा

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे मंगळवारी (दि.१४) पुरूष मंडळींनी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली. अगदी महिलांप्रमाणेच या पुरूष मंडळींनी वटवृक्षाची पूजा करून वटवृक्षाला सात फेर्‍या मारल्या. त्याचबरोबर जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी, तिला निरोगी, दीर्घ आयुष्य लाभावे, अशी भावना व्यक्त केली. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र महिला वर्गाने वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.

कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आणि प्रतिष्ठित स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी राबविला जात आहे. संसाराच्या रहाटगाड्यात पुरुषाला समर्थपणे साथ देणाऱ्या पत्नी प्रति श्रद्धा भाव व आदरभाव व्यक्त करण्यासाठी, पत्नीच्या त्यागाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा सण साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये आणि संसारामध्ये स्त्रियांच्या सहकार्याचा वाटा मोठा आहे. याची जाणीव ठेवून ही वटपौर्णिमा पुरूष मंडळींनी साजरी केली.

वटपौर्णिमेला जन्मोजन्मी हाच पती मिळावा, असं पत्नीचं व्रत असतं. याला अनूसरूनच आपल्या संसाराचा भार उचलणारी पत्नी, जन्मोजन्मी आपल्याला जोडीदारीण म्हणून मिळावी या पवित्र हेतूने कुडाळ येथील पुरूष मंडळींनी हे व्रत केले.

गवळदेव येथे वडाची पूजा

गवळदेव मंदीर येथे वडाची पूजा करून येथील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक दरवर्षी वटवृक्षाची पूजा करून वटवृक्षाला सात फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी करतात. यंदाही येथील गवळदेव मंदीर जवळ पुरूषवर्गाने एकत्र येत वटपौर्णिमा साजरी केली. उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर, डॉ.सुरज शुक्ला, डॉ. व्यंकटेश भंडारी, प्रा. अरुण मर्गज, प्रा. परेश धावडे, राजू कलिंगण, सुरेश वरक, प्रसाद कानडे, संतोष पडते, सुनील गोसावी, गजा टारपे आदींसह ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी कुडाळ परिसरातील नागरिक, प्रतिष्ठित मंडळी तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कुडाळ येथील या पुरूषमंडळींच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे ज्येष्ठ, प्रतिष्ठित लोकांनी कौतुक केलेच, पण त्याचबरोबर तेथे वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी आलेल्या महिलांनी सुद्धा समाधान व्यक्त केले. दरम्यान जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात महिलांनी मोठ्या प्रमाणात वटपौर्णिमा साजरी केली.

हेही वाचा

Back to top button