कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती | पुढारी

कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती

चिपळूण ; समीर जाधव : कोयना जलविद्युत केंद्राने गत जलवर्षामध्ये विक्रमी वीजनिर्मितीचा विक्रम केला आहे. 2021-22 या जलवर्षामध्ये मागील आठ वर्षांचे रेकॉर्ड तोडून तब्बल 3 हजार 868 दशलक्ष युनिटस् वीजनिर्मिती करण्याचा विक्रम केला आहे. प्रकल्पाच्या हीरक महोत्सवी वर्षात वीज टंचाईच्या काळात हा प्रकल्प राज्यासाठी दिलासा देणारा ठरला आहे.

चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणारा हा प्रकल्प असून 16 मे 1962 पासून या प्रकल्पातून स्वच्छ, नितळ व प्रदूषणविरहित वीजनिर्मिती सुरू आहे. पाण्यावर निर्माण होणारी सर्वात स्वस्त वीज म्हणून या प्रकल्पाची देशभरात ख्याती असून भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा हा जलविद्युत प्रकल्प ठरला आहे.

जुलै 2021 मध्ये आलेला महापूर, सह्याद्री पट्ट्यात झालेला प्रचंड पाऊस, चिपळुणातील पूर परिस्थिती, चौथ्या टप्प्याच्या अवजल विसर्गाच्या मुखाशी प्रवाहाने जमा झालेला गाळ, कोसळलेली दरड यामुळे चौथा टप्पा ऑगस्ट महिन्यात तब्बल एक महिना बंद ठेवावा लागला होता. त्या प्रमाणेच वीज केंद्राकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक ठिकाणी झालेले भूस्खलन अशा आव्हानांना तोंड देत कोयना जलविद्युत केंद्राने वीजनिर्मितीचा आठ वर्षांतील आकडा मागे टाकला आहे.

विशेषकरून सप्टेंबर व ऑक्टोबर 2021 यामध्ये संपूर्ण देशातच दगडी कोळशाची टंचाई निर्माण झाली होती. अशा विपरित परिस्थितीत कोयना जलविद्युत प्रकल्प राज्य व देशासाठी धावून आला व या दोन महिन्यांच्या काळात 781 दशलक्ष युनिटस् इतकी वीजनिर्मिती करण्यात आली. मार्च, एप्रिल व मे मध्ये विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि भारनियमन होणार अशी अवस्था असताना देखील अत्यावश्यक काळात तीन महिन्यात 1,792 दशलक्ष युनिटस् वीजनिर्मिती करण्यात यश मिळविले.

कोयना वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज अन्य ठिकाणच्या विजेपेक्षा स्वस्त असून या विजेमुळे वीज ग्राहकांवरील अतिरिक्त भार देखील कमी होतो हे वैशिष्ट्य आहे. वीजनिर्मितीसाठी सीईएने 2021-22 साठी 3,384 दशलक्ष युनिटस् हे उद्दीष्ट दिले होते. मात्र, हे उद्दीष्ट पार करून 3,868 दशलक्ष युनिटस् वीजनिर्मिती झाली आहे.

कोयना वीज प्रकल्पाच्या इतिहासात ही विक्रमी कामगिरी असून यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना भारनियमनापासून दिलासा मिळाला आहे. भविष्यात देखील अशाच पद्धतीने काम करून कोयना वीज प्रकल्प या पुढेही यशस्वीपणे काम करील असा विश्वास कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी व्यक्त केला आहे. या कामगिरीबद्दल महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक चंद्रकांत खोटवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात यश मिळाले असे श्री. चोपडे यांनी सांगितले.

… तर वीजनिर्मितीसाठी पाणीटंचाई

कोयना धरणातून पाणी बोगद्यातून कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी टर्बाईनवर सोडले जाते. हा प्रकल्प चिपळूण तालुक्यातील पोफळी येथे आहे. चार टप्प्यातून वर्षभर वीजनिर्मिती होत असते. प्रकल्पासाठी कोयना धरणातील 105 टीएमसी पैकी 67 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरता येते. 1 जून ते 31 मे या कालावधीत हा पाण्याचा कोटा देण्यात आलेला असतो. त्याला जलवर्ष म्हणतात. या जलवर्षामध्ये वीजनिर्मिती होत असते. आता नवीन जलवर्ष सुरू झाले असून पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोयना धरणात अवघे 17 टीएमसी पाणी असून भविष्यात वीजनिर्मितीसाठी पाण्याची टंचाई होऊ शकते.

Back to top button